नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कडधान्ये
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवड
खरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करण्यात येते. या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो. कमी कालावधीमध्ये अधिक आर्थिक फायदा मिळवून देणारी पिके म्हणून शेतकऱ्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे या पिकाच्या तोडणीनंतर पाला पाचोळा जमिनीत पडून जमिनीचा पोत सुधारतो. शेंगवर्गीय पीक असल्यामुळे रायझोबियम जीवाणूद्वारा जमिनीतील नत्राचा साठा वाढण्यास मदत होते.
खरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करण्यात येते. या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो. कमी कालावधीमध्ये अधिक आर्थिक फायदा मिळवून देणारी पिके म्हणून शेतकऱ्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे या पिकाच्या तोडणीनंतर पाला पाचोळा जमिनीत पडून जमिनीचा पोत सुधारतो. शेंगवर्गीय पीक असल्यामुळे रायझोबियम जीवाणूद्वारा जमिनीतील नत्राचा साठा वाढण्यास मदत होते.
आहारामध्ये अविभाज्य घटक असलेल्या प्रथिनांचा १८ ते २० टक्के, ५६ टक्के मेदाचा पुरवठा आपणास मुग व उडीदापासून मिळतो. सर्वसाधारणपणे २० टक्के उर्जेची गरज भागविली जाऊ शकते. देशाची डाळीची मागणी पूर्ण करण्यासाठी डाळीची आयात करावी लागत आहे. सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात फायदा दिसून येईल.
मुग व उडीद पिकांची उत्पादकता कमी असल्याची कारणे
- खरीप हंगामात अनियमित पडणारा पाऊस.
- अयोग्य जमिनीची निवड.
- जैविक बिजप्रक्रीयेचा अवलंब न करणे.
- सुधारित बियाण्यांचा अभाव, अपुरी खतांची मात्रा.
- प्रती हेक्टरी झाडांची योग्य संख्या राखली जात नाही.
जमिनीची निवड व पूर्वमशागत
मूग आणि उडीद पिकाला मध्यम ते भारी,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीवर या पिकांची लागवड करू नये. या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन, धसकटे, काडीकचरा वेचून मे महिण्याच्या अखेरपर्यंत जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीअगोदर १५ ते २० गाड्या शेणखत हेक्टरी जमिनीत मिसळावे.
पेरणीचा कालावधी
ही दोन्ही पिके पाऊस पडल्यावर व जमीन वापसा आल्याबरोबर लवकरात लवकर पेरावी. शक्यतो जुनचा तिसरा ते जुलै च्या पहिल्या आठवड्या दरम्यान करावी. पेरणीस जसा उशीर होईल त्या प्रमाणात उत्पादनातही घट होत जाते.
बियाण्यांचे प्रमाण
प्रती हेक्टरी रोपांची संख्या राखण्याकरिता १२ ते १५ किलो बियाणे वापरावे.
पेरणीचे अंतर
दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी. असावे.
बीजप्रक्रिया
बी पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास कार्बेन्डाझीम* ३ ग्रॅम किंवा थायरम* २ ग्रम चोळावे. तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबिअम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम किंवा द्रवरूप रायझोफॉस १०० मिली प्रती १० किलो बियाण्यास लावावे.
सुधारित वाणांची निवड
वाण | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विंटल/हे.) | प्रमुख वैशिष्टे |
मुग | |||
कोपरगाव | ६० ते ६५ | ९ -१० | दाणे टपोरे, हिरवा रंगाचा व चमकदार |
बीएम ४ | ६० ते ६५ | १० - १२ | मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
बिपीएमआर १४५ | ६० ते ६५ | ७ – ८ |
लांब शेंग, दाणे चमकदार व मोठ्या आकाराचे |
बीएम २००२-०१ | ६५ ते ७० | १० - १२ |
मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
बीएम २००३-०२ | ६५ ते ७० | १० - १२ | मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
फुले मुग -२ | ६० ते ६५ | १० - १२ | मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी |
पी.के.व्ही.ए.के.एम ४ | ६० ते ६५ | १२ – १५ | मध्यम दाणे, एकाच वेळी परिपक्व होणारा व बहुरोग प्रतिकारक –संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस |
उडीद | |||
बिडीयु - १ | ७० ते ७५ | ११ – १२ | भुरी रोगास प्रतिकारक, दाणे मध्यम काळ्या रंगाचे टपोरे असून – संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस |
टीएयु -१ | ७० ते ७५ | १० - १२ | भुरी रोग प्रतिकारक, शेंग काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे |
टीपीयु - ४ | ६५ ते ७० | १०-११ | लवकर तयार होणारा, दाणे काळे टपोरे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस |
खत व्यवस्थापन
शेवटच्या वखरणी अगोदर ६ ते ८ टन प्रती हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे.
पेरणीच्यावेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत व तण नियंत्रण
ही पीक कमी कालावधीची असल्याने उभ्या पिंकामध्ये वेळीच आंतर मशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी वा एक खुरपणी करून घ्यावी. गरज भासल्यास परत एक निंदण करावे. त्यामुळे आंतरमशागतीसोबतच तणाचे नियंत्रण होते.
आंतरपीक पद्धतीचा वापर
आंतरपीक म्हणून या पिकांना विषेश महत्त्व आहे. दोन्ही पिके तूर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.
संपर्क- डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३
(विषय विशेषज्ञ -कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई जि. बीड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. परभणी.)
(*ॲग्रोवन टीप- लेखात उल्लेखलेल्या रसायनांवर बंदी आणण्याचे केंद्र सरकारकडून प्रस्तावित आहे, तथापि ४५ दिवसांचा कालावधी ना हरकत व सूचना मागवण्यासाठी दिला असल्यामुळे त्यानंतरच त्याविषयीचा निर्णय स्पष्ट होईल.)
- 1 of 3
- ››