अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारी

 cultivation practices for new grape orchard
cultivation practices for new grape orchard

द्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. एकदा लागवड झाली की द्राक्ष वेलीचे आयुष्य साधारण १२ ते १४ वर्षांचे असते. यामुळे लागवडीच्या वेळी घेतलेले अनेक निर्णय त्या वेलीची आणि पर्यायाने प्रति एकर बागेची उत्पादनक्षमता ठरवत असतात. लागवडीवेळी पुढील महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. माती व पाणी परीक्षण महत्त्वाचे  ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करणार आहोत, तेथील मातीमध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही जाणून घेतली पाहिजे. बऱ्याच बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण कमी अधिक आढळून येते. या चुनखडीच्या उपलब्धतेमुळे वेलीस अन्य अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा येतात किंवा खंडित होतो. परिणामी, वेलीचे उत्पादन कमी राहते. काही परिस्थितीमध्ये वेलीचे आयुष्यही कमी होते. बऱ्याच ठिकाणी बोअरवेल व विहिरीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. अशा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. पाण्यातील अधिक क्षारांमुळे वेलीची शाकीय वाढ होत नाही, तर काही स्थितीमध्ये पानांवर स्कॉर्चिंग येते. यामुळे उत्पादनामध्ये घट येते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थितीमध्ये योग्य खुंटाची निवड महत्त्वाची असते. याकरिता लागवडीपूर्वी माती व पाणी तपासून घेणे गरजेचे समजावे. लागवडीची दिशा ठरवणे   द्राक्ष बागेमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीच्या अनुषंगाने वेलीला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असतो. योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी बागेतील लागवडीची दिशा आणि बागेमध्ये ठेवलेली वळण पद्धती अत्यंत महत्त्वाची असते. जास्त क्षेत्र असल्यास आणि बागेतील सर्व कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ‘वाय’ किंवा ‘विस्तारित वाय’ पद्धतीचा वापर महत्त्वाचा असतो. या वळण पद्धतीचा वापर करताना लागवडीची दिशा उत्तर दक्षिण असावी. या तुलनेत मांडव पद्धतीचा वापर करणार असल्यास, लागवडीच्या दिशेचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नसते. लागवडीचे अंतर ठरवणे  आपल्याकडे हलकी, भारी व मध्यम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आढळून येतात. भारी जमिनीमध्ये वेलीच्या वाढीचा जोम जास्त असतो, तर हलक्या जमिनीमध्ये तो कमी असतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी अधिक असल्यामुळे त्याचा परिणाम वेलीच्या वाढीवर होतो. या गोष्टींचा विचार करून वेलीतील अंतर ठरवावे. भारी जमिनीत दोन ओळीत १० फूट व वेलीमध्ये ५ ते ६ फूट अंतर पुरेसे होईल. हलकी ते मध्यम प्रतीच्या जमिनीत दोन ओळीमधील अंतर ९ फूट, तर वेलीतील अंतर ५ फूट असावे. चारी घेणे व खताचीं पूर्तता करणे   बऱ्याच बागेत काही ठिकाणी जमीन बरच्या एक फूट थरामध्ये मोकळी असते, तर त्याखाली खड किंवा घट्ट जमीन असते. यामुळे द्राक्ष वेलीच्या मुळांच्या कक्षेत एकसारखे पाणी राहत नाही. चारी घेऊन माती मोकळी करणे गरजेचे असते. खुंटरोपांची मुळे खोलपर्यंत पोचण्यासाठी चारी दोन ते अडीच फूट खोल व तितकीच रुंद असावी. यामुळे पुढील काळात मुळांचा विकास चांगल्या प्रकारे होईल. द्राक्ष बागेत पुढील काळात शिस्तबद्ध कार्य होण्यासाठी चारीची लांबी २५० फूटपर्यंत असावी. चारीमध्ये खतांची पूर्तता महत्त्वाची आहे. चारीमध्ये प्रत्येक तीन फूट अंतराकरिता एक घमेले शेणखत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घ्यावे. सोबत प्रति एकर ५० किलो डीएपी टाकून चारी झाकून घ्यावी. सुरुवातीस सूक्ष्म अन्नद्रव्यांची फारशी गरज नसेल. खुंटरोपांची लागवड करणे खुंटरोपांची लागवड करण्याचा कालावधी हा जानेवारी महिन्यात असतो. या वेळी वातावणातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे रोपांच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढायला सुरुवात होते. ही परिस्थिती साधारणतः १५ जानेवारीनंतर अनुभवास येते. या वेळी लागवड केल्यास वाढ चांगल्या प्रकारे होते. जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या रोपांची मुळे जमिनीत खोलपर्यंत जाऊन जमिनीच्या वर असलेल्या रोपांची फुटी व्यवस्थित वाढतील. कलम करण्याकरीता रोपांची काडी ही ७ ते ८ मि.मी. जाडीची असावी. जमिनीच्या वर जवळपास १ ते सव्वा फूट अंतरावर लागवड करावी. काडीची ही जाडी मिळवण्यासाठी ६ ते ७ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. तेव्हा कलम तयार करण्याच्या हेतूने आवश्यक जाडीची काडी मिळवण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये लागवड करणे फायद्याचे ठरते. संपर्कः आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com