Cultivation practices of Niger
Cultivation practices of Niger

तंत्र कारळा लागवडीचे...

कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.

कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते. कारळा पिकामध्ये ३५ ते ४० टक्के तेल, २० ते २५ प्रथिनांचे प्रमाण असते. याची लागवड खरीप, उशिरा खरीप आणि रब्बी हंगामात करता येते. निकृष्ट, कमी कसदार, डोंगर उतारावर, भरड जमिनीत लागवड करता येते. या पिकाला कमी किंवा अधिक पाण्याचा परिणाम जाणवत नाही, यास रानटी जनावरे खात नाहीत तसेच मृदा संवर्धनही उपयुक्त आहे. कारळा हे पीक हलकी ते भारी सर्व जमिनीत येते. जमिनीचा सामू ५.२ ते ७.३ असल्यास चांगले उगवते. पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. खारवट जमिनीतदेखील चांगले उत्पादन येते.

  • पेरणीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.
  • एक हेक्टरसाठी ४ ते ५ किलो बियाणे लागते. लागवडीसाठी फुले कारळा, फुले वैतरणा या जातींची निवड करावी. या जातींचे हेक्टरी ५०० किलो उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ३ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक १० ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी. यामुळे चांगली उगवण होते.
  • बरेचशे शेतकरी पेरणी बी फोकून करतात. मात्र अधिक उत्पादनासाठी तिफणीने ३० x १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे वाळू, बारीक मऊ शेणखत किंवा राखेमध्ये मिसळून २ ते ३ सें. मी. खोलीवर पेरावे. पेरणी झाल्यानंतर मातीने झाकावे.
  • पेरणीच्या पुरेसे शेणखत मिसळावे. त्याचबरोबरीने हेक्टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी वीस किलो नत्र द्यावे. तसेच गंधक २० ते २५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. त्यामुळे तेलाच्या मात्रेत वाढ होते.
  • पीक चांगले उगवून आल्यावर दाट पेरणी असल्यास पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपांमधील अंतर १० सें. मी. ठेवावे. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. ठेवावे. तणाचा प्रादुर्भाव दिसताच पहिली खुरपणी पेरणी नंतर ३० दिवसांनी तर दुसरी खुरपणी ६० ते ६५ दिवसांनी करावी.
  • वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार एक किंवा दोन पाण्याची आवश्यकता भासते. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यास त्वरित पाणी द्यावे. पिकाची वाढीची अवस्था सुरुवातीस २० ते ४० दिवसांची असते. या दरम्यान पावसाचा खंड पडल्यास त्वरित पाणी द्यावे. पिकाची दाणे भरण्याची अवस्था ६० ते ७० दिवसांत असते. या दरम्यान पावसाचा खंड पडल्यास त्वरित पाणी द्यावे.
  • कारळा पिकाच्या चिकट पराग कणांचे हवेमार्फत परागीभवन होण्यास अडचणी येतात. परिणामी या पिकास परागीभवन होऊन बी तयार होण्यासाठी किटकांवर विसंबून रहावे लागते. याची फुले पिवळ्या रंगाची असूयाचा कालावधी पेरणीनंतर ५० ते ८० दिवसांपर्यंत टिकतो. त्यामुळे कीटकांना आकर्षित करण्यासाठी आदर्श परिस्थिती असते. एकरी एक मधुमक्षिका पेटीचा वापर केल्यास उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ दिसून येते.
  • संपर्क- डॉ. कैलास भोईटे ः ९४०४६९५९१९, ०२५५३-२४४०१३ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com