धान्य, चाऱ्यासाठी बाजरी

बाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षाचांगले धान्य आणि चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.
cultivation practices of Pearl millet
cultivation practices of Pearl millet

बाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षाचांगले धान्य आणि चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. बाजरीचे पीक पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे हलक्या ते मध्यम खोल जमीन लागवड करावी. चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा.जमीन भुसभुशीत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी दडपून उगवणीवर विपरीत परिणाम होणार नाही. पेरणी

  • १५ जून ते १५ जुलै या कालावधीत करावी. त्यानंतर पेरणीस उशीर झाल्यास अरगट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि उत्पादनात घट येते.
  • सुधारित किंवा संकरित जातीचे हेक्‍टरी ४ किलो बियाणे वापरावे.
  • चाऱ्यासाठी हेक्टरी १० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • बीजप्रक्रिया २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया

  • अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
  • प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. त्या द्रावणात तरंगणारे हलके बियाणे वेगळे करावे. तळाला राहिलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे.
  • सावलीत वाळविलेल्या बियाण्यास मेटेलॅक्‍झील (३५ एस.डी.) ६ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी.
  • दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर अॅझोस्पिरिलम किंवा अॅझेटोबॅक्टर व पीएसबी हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (२५० ग्रॅम गूळ + १ लिटर पाणी) एकत्र करून बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे किंवा अॅझेटोफॉस २०० मि.लि. प्रति एक किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यानंतर लगेच पेरणी करावी.
  • पेरणीचे अंतर

  • जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींत ४५ सें.मी. तर दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवावे.
  • पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते.
  • पेरणी दोन ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोल करू नये. यापेक्षा खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते. यासाठी पाभरीच्या फणास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी म्हणजे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत. बियाणे अपेक्षित खोलीवर पेरले जाईल.
  • आपत्कालीन परिस्थितीत उशिरात उशिरा ३० जुलैपर्यंत पेरणी करता येते.
  • जातींची निवड

    जाती कालावधी धान्य उत्पादन (क्विं. प्रति हेक्टर) चारा उत्पादन( टन प्रति हेक्टर)
    संकरित जाती
    श्रद्धा ७५ते ८० २५ ते ३० ५ ते ६
    सबुरी ६५ ते ८० २६ ते ३२
    जीएचबी-५५८ ७५ ते ८० ३० ते ३५ ५ ते ६
    शांती ८० ते ८५ ३० ७ ते ८
    पीकेव्ही-राज ८० ते ८५ २९ ५ ते ६
    एएचबी-१२०० ८० ते ८५ २९  ५ ते ६
    एएचबी-१२६९ ८० ते ८५ २९ ५ ते ६
    सुधारित जाती
    आयसीटीपी ८० ते ९० २२-२५
    समृद्धी ८५ ते ९० २०-२५ ३.५ ते ४
    परभणी संपदा ८५ ते ९० २५-३० ४ ते ४.५
    एबीपीसी-४-३ ८० ते ८५ २७-३० २.७ ते ४.५  
    डब्लूसीसी-७५ ८५ ते ९० १५ते२० ४ ते ५.५
    आयसीएमव्ही२२१ ७५ ते ८० १७ ते २० ४.५ ते ५

    खत व्यवस्थापन

  • अवर्षणप्रवण भागात पेरणीच्या वेळी हलक्या जमिनीसाठी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश प्रति हेक्टरी तसेच मध्यम किंवा भारी जमीन व बरा पाऊस पडणाऱ्या भागात हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे.
  • खतांच्या मात्रेपैकी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी पेरून द्यावे. अर्धे नत्र पेरणी नंतर ३० दिवसांनी द्यावे.
  • १९:१९:१९ या विद्राव्य खताची (५० ग्रॅम प्रति १०लिटर पाणी) फवारणी पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी करावी. तसेच फेरस सल्फेटची (७५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.
  • पाणी व्यवस्थापन पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (२०-२५ दिवसांनी) दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना (५०-५५ दिवसांनी) द्यावे. आंतरमशागत पहिल्या ३० दिवसांपर्यंत पीक तण विरहीत ठेवावे. एक खुरपणी व दोन कोळपणी करावी. आंतरमशागत वेळेवर केली नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते. हंगाम मध्यान्ह उपाययोजना

  • चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृदाबाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा.
  • पिकात काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल. पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरते. त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.
  • आंतरपीक 

  • अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.
  • बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना २:१/ ४:२ किंवा ३:३ (बाजरी : तूर ) ओळी प्रमाणे आंतरपीक घ्यावे.
  • हलक्या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी २:१ या प्रमाणात आंतरपीकपद्धत अवलंब करावा.
  • संपर्क - ०२४८२-२६१०२१ डॉ. दिपाली कांबळे, ९३०७१६३९३९ ( कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर,जि.जालना,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com