तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..

पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करावा. दोन ओळीमध्ये ४५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी दोन रोपांत १० ते १२ सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी. एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे.
Cultivation practices of sorghum
Cultivation practices of sorghum

पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करावा. दोन ओळीमध्ये ४५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी दोन रोपांत १० ते १२ सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी. एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे. खरीप ज्वारी ही मुख्यत्वे करून कोरडवाहू पीक म्हणून घेतली जाते. लागवडीसाठी मध्यम ते खोल, भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू ५.५ ते ८.५ असलेली जमीन निवडावी. जास्त हलक्या जमिनीत लागवड करू नये. ज्वारी पिकासाठी दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्‍यकता नसते. नांगरणी २ ते ३ वर्षातून एकदा करावी. पीक काढल्यानंतर लगेच नांगरट करावी. पाऊस पडल्यानंतर ३ ते ४ वेळा वरखणी करून जमीन तयार करावी. खरीप हंगामासाठी एप्रिल ते मे महिन्यात पहिली वखराची खोल पाळी देवून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. संकरीत व सुधारीत वाण 

वाण परिपक्वतेस लागणारा कालावधी (दिवस) हेक्टरी उत्पादन(क्विं.) 
अ)लवकर येणारे संकरित वाण
सी.एस.एच-१४ १०० ते १०५- ४८ ते ५० 
सी.एस.एच-१७ १०० ते १०५ ४२ ते ४५ 
सी.एस.एच-३० १०० ते १०५ ४० ते ४५ 
ब)मध्यम कालावधीचे संकरित वाण
सी.एस.एच-९ ११० ते ११५- ४८ ते ५० 
सी.एस.एच-१६ ११० ते ११५ ४५ ते ५०
सी.एस.एच-२५ -११० ते ११५ ४५ ते ५०
एस.पी.एच-१६३५- ११० ते ११५- ४८ ते ५०
सी.एस.एच-३५ ११० ते ११५ ४८ ते ५०
क) सुधारीत वाण
सी.एस.व्ही-२० ११५ ते १२० ३६ ते ३८
सी.एस.व्ही-२७ ११० ते ११५ २५ ते ३०
सी.एस.व्ही-३४ ११० ते ११२ ३८ ते ४०

बियाणे लागवडीसाठी हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे पूरेसे आहे. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करावा. जेणेकरून पेरणीसोबत खते देता येतात. बीजप्रक्रिया

  • प्रति किलो बियाणांस २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, २० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा (बुरशीनाशक) यांची बीजप्रक्रिया करावी.
  • ॲझोटोबॅक्टर मुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन पिकास नत्र उपलब्ध होते. स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) जमिनीत अन्नद्रव्य स्वरुपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून ते पिकास उपलब्ध करुन देतात. तसेच पिकासाठी उपयुक्त असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्यही हे सुक्षजीव करतात. ट्रायकोडर्मा जमिनीतील रोगकारक बुरशीचे नियंत्रण करते.
  • पेरणीची वेळ

  • जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाल्यानंंतरच पेरणी करावी.
  • पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणी वेळेवर करावी.
  • वेळेवर पेरणी केल्यामुळे खोडमाशीपासून पिकाचे होणारे नुकसान टाळले जाते. उशीरा पेरणी झाल्यास मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडाची योग्य ती संख्या मिळत नाही.
  • पेरणी पद्धत

  • दोन ओळीमध्ये ४५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी.
  • उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी दोन रोपांत १० ते १२ सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी. एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे.
  • खत व्यवस्थापन

  • पेरणीपूर्वी हेक्टरी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळावे.
  • हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाशची शिफारस आहे. त्यापैकी पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा (४० किलो नत्र) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. उर्वरीत ४० किलो नत्र पीक २५ ते ३० दिवसांचे झाल्यानंतर द्यावे.
  • आंतरमशागत पेरणी उताराला समांतर न करता उताराला आडवी आणि कंटूर पध्दतीने करावी. सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरवातीचे ३५ ते ४० दिवस पीक तण विरहीत ठेवावे. पेरणीपूर्वी जांभूळवाही द्यावी. पेरणीनंतर आवश्‍यकतेनुसार १ ते २ निंदण्या आणि २ ते ३ वेळा डवऱ्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी व्यवस्थापन  पीक वाढीच्या नाजूक अवस्थेत असताना पिकांस पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक वाढीच्या नाजूक अवस्था

    वाढीची अवस्था पेरणीपासून दिवस
    पिकाची जोमदार वाढीची सूरूवात २५ ते ३०
    पीक पोटरीत येण्याचा काळ ५० ते ५५
    पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ ७० ते ७५
    दाणे भरण्याचा काळ ९० ते ९५

    कीड व्यवस्थापन खोडमाशी

  • प्रादुर्भाव झालेली रोपे काढून नष्ट करावीत व विरळणी करावी.
  • इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के) १२ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • खोडकिडा 

  • पानावरील अंडीपुंज पानासहीत तोडून त्यांचा नायनाट करावा. पिकाची फेरपालट करावी.
  • जैविक व्यवस्थापनासाठी उगवणीनंतर ३० आणि ४० व्या दिवशी ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची हेक्टरी १.५ लाख अंडी सोडावीत.
  • मिजमाशी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपर्क - डाॅ. गोपाल ठाकरे,९५५२६८०८८८ डाॅ.आर.बी. घोराडे,९८५०७२३७०६ (ज्वारी संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com