सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान

सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे तेलबियावर्गीय पीक असून यात प्रथिने ४० टक्के तर तेलाचे प्रमाण २० टक्के असते. व्यवस्थापनातील सर्व बाबींचा अंगीकार योग्य प्रकारे म्हणजेच काटेकोर केल्यास पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास निश्‍चित मदत होईल.
intercropping of soyabean and Pigeon pea
intercropping of soyabean and Pigeon pea

सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे तेलबियावर्गीय पीक असून यात प्रथिने ४० टक्के तर तेलाचे प्रमाण २० टक्के असते. व्यवस्थापनातील सर्व बाबींचा अंगीकार योग्य प्रकारे म्हणजेच काटेकोर केल्यास पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास निश्‍चित मदत होईल. सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन व गुणवत्तावाढीसाठी व्यवस्थापन लागवड तंत्र असे. जमीन, हवामान व पेरणी व्यवस्थापन

  • पाण्याचा चांगला निचरा होणारी, आम्ल-विम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ पर्यंत असणारी मध्यम प्रतीची जमीन योग्य आहे. जास्त भारी जमिनीत झाडांची शाखीय वाढ जास्त प्रमाणात होते.
  • हे पीक समशीतोष्ण हवामानात उत्तम येते. २५ ते ३५ ० सेल्सिअस तापमान योग्य आहे.
  • पूर्वमशागत - जमीन १५ ते २० सेंमी खोल नांगरून वखराच्या २ ते ३ पाळ्या देवून जमीन समपातळीत आणावी.
  • पेरणी - १५ जुलैपूर्वी पेरणी करावी. त्यापूर्वी जमिनीत कमीतकमी ५० टक्के ओलावा असणे आवश्यक आहे. पुरेशी ओल असल्यास साधारणतः ३ ते ४ सेंमी. खोलीवर पेरणी करावी. यापेक्षा खोलवर पेरणी करू नये. जेणेकरून उगवण शक्तीवर परिणाम होइल.
  • हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. दोन ताटांतील अंतर ५ सेंमी तर दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी ठेवून हेक्टरी ४ ते ४.५ लाख झाडांची संख्या ठेवणे आवश्यक आहे.
  • बीजप्रक्रिया - पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, रायझोबीयम व पीएसबी या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
  • आंतरमशागत

  • पेरणीपासून १५ दिवसांच्या अंतराने प्रति हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाख ठेवून आवश्यकतेनुसार विरळणी करावी.
  • आवश्यकतेनुसार दोन कोळपण्या करावेत. पहिली कोळपणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी तर दुसरी ३०-३५ दिवसांनी करावी. त्यानंतर एक ते दोन हातखुरपण्या कराव्यात. रान तणविरहित ठेवावे.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • सोयाबीन पीक अन्नद्रव्यांना चांगला प्रतिसाद देते. एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेणखत किंवा कंपोस्ट त हेक्टरी ५ टन द्यावे. प्रति हेक्टरी नत्र १५ किलो (३५ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ) द्यावे.
  • मराठवाडा विभागातील जमिनींमध्ये गंधक, लोह, जस्त या अन्नद्रव्यांची मोठया प्रमाणावर कमतरता दिसून येते. जेथे माती परिक्षण झाले नाही अशा ठिकाणी दोन ते तीन वर्षांतून एकदा गंधक (२० किलो प्रति हेक्टरी), झिंक सल्फेट (२० किलो प्रति हेक्टरी), फेरस सल्फेट (२० ते २५ किलो प्रति हेक्टरी) आणि बोरॅक्स (५ किलो प्रति हेक्टरी) लागवड करताना जमिनीतून घ्यावे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार खते दिल्यास ते योग्य ठरेल.
  • सोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे गंधकाची मात्रा देणे फायदेशीर ठरते.
  • तण व्यवस्थापन

  • तण नियंत्रण तसेच जमिनीत हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने पेरणीनंतर ३ आणि ६ आठवड्यांनंतर कोळपणी व खुरपणी करावी.
  • सुरुवातीचा १५ ते ४ दिवस पीक-तण स्पर्धेच्या दृष्टीने संवदेनशील कालावधी आहे. यामध्ये पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर कोळपणी करू नये.
  • हवामान बदलामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. एखादे पीक हातचे गेले तर दुसरे पीक हाती लागते.
  • बांधबंदिस्तीचे महत्त्व

  • अति पाऊस झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणीपूर्वीच जमिनीची चांगली बांधबंदिस्ती करावी. मराठवाड्याच्या भारी काळया जमिनीत निचरा होण्याच्या दृष्टीने ठरावीक अंतरावर चर काढून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी.
  • संततधार पाऊस असल्यास त्वरित शेतात साचलेले पाणी काढून दयावे. आंतरमशागत करून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  • पीक अतिरिक्त पाण्यामुळे अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटते. अशावेळी फवारणीतून पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ५० ते १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पावसात खंड पडल्यास व्यवस्थापन

  • सर्वसाधारण: जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पावसाचे एक ते दोन मोठे खंड व तेही पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत असताना येतात. त्यामुळे पीक वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी शिवारातील विविध प्रकारची मृदा व जलसंधारणाची कामे करून शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित पाण्याच्या १ ते २ सुविधा उपलब्ध कराव्यात. त्यामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते.
  • मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. ठरावीक अंतरावर जेथे पीक घेतले नाही तेथे मृत चर काढावेत.
  • पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी आंतरमशागतीची कामे आटोपल्यानंतर चार ओळीनंतर एका ओळीत १० ते २० सेंमी खोलीचा उथळ चर वा सरी काढली. ज्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल. कमी पाऊस झाल्यास पावसाचे पडणारे पाणी मुरवता येईल.
  • पावसाचा खंड पडल्यास आच्छादनाचा वापर करावा. जेणे करुन जमिनीतील ओलावा टिकून राहील. यात भात, सोयाबीन, गहू, यांचा भुसा, वाळलेले गवत (५ टन प्रति हेक्टर) किंवा गिरीपुष्प किंवा सुबाभूळ यांचा पाला (२.५ टन प्रति हेक्टर) वापरावा.
  • पाण्याचा ताण जास्त असल्यास केओलिन (७ टक्के) या परावर्तकाचा (ॲटीट्रान्सपरन्ट) किंवा पोटॅशियम नायट्रेट ०.५ ते १.० टक्के फवारणी करावी.
  • एकात्मिक कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन पेरणीपूर्वी

  • लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.
  • मागील हंगामातील सोयाबीनच्या अवशेषांची विल्हेवाट लावावी.
  • पेरणी करण्याच्या वेळी

  • खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. मात्र बियाणे घेतेवेळी त्यास केलेली प्रक्रिया तपासणे गरजेचे आहे.
  • मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी. त्यावर येणाऱ्या स्पोडोप्टेरा लिट्युरा आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळयांसहित नष्ट करावीत.
  • पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
  • सरी वरंबा किंवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीचे होईल.
  • पीक फेरपालट करावी. सोयाबीननंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.
  • पेरणी केल्यानंतर

  • पीक सुरुवातीच्या अवस्थेत तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.
  • कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा.
  • स्पोडोप्टेरा लिट्युरा व केसाळ अळ्या यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत.
  • हिरवी घाटे अळी व स्पोडोप्टेरा लिट्युरा यांची प्रादुर्भावाची पातळी
  • समजण्यासाठी सर्वेक्षणासाठी प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत.
  • शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे पक्षीथांबे लावावेत.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • रोग नियंत्रण बीजप्रक्रियेसाठी शिफारस केलेली बुरशीनाशके रोगाचे नाव - बियाणे व रोपकूज बुरशीनाशक-   पेनफ्ल्युफेन १३.२८ टक्के अधिक ट्रायफ्लोक्झीस्ट्रॉबीन १३.२८ टक्के एफएस- मात्रा- प्रति किलो बियाणे- ८ ते १० मिली रोग अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बेडकाच्या डोळ्यासारखे पानावरील ठिपके

    बुरशीनाशके मात्रा प्रति १० लीटर पाणी
    पायरॅक्लोस्ट्रोबीन २० डब्ल्यूजी ७-१० ग्रॅम
    पिकॉक्सीस्ट्रॉबीन २२.५२ टक्के एससी ८ मिली
    फ़्ल्युक्झॅपायरॉक्झॅड १६७ ग्रॅम प्रति लि. अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन ३३३ ग्रॅम प्रति लि. एससी ६ मिली

    शेंगांवरील करपा

  • टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के इसी १२.५ ते १५ मिली
  • टेब्युकोनॅझोल १० डब्ल्यूपी अधिक सल्फर ६५ डब्ल्यूजी २५ ग्रॅम
  • तांबेरा

  • हेक्झाकोनॅझोल ५ टक्के ईसी १० मिली
  • क्रेसोक्झीम मिथाईल ४४.३ टक्के एससी १० मिली
  • पिकॉक्सीस्र्टॉबीन २२.५२ टक्के एससी ८ मिली
  • संपर्क- डॉ. बसवराज भेदे- ९८९०९१५८२४ (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com