पुणे विभागात पावसाअभावी आडसाली उसाच्या लागवडी

पावसाअभावी आडसाली उसाच्या लागवडी खोळंबल्या
पावसाअभावी आडसाली उसाच्या लागवडी खोळंबल्या

पुणे ः उशिराने दाखल झालेल्या पावसाचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उसाच्या उशिराने लागवडी सुरू केल्या आहेत. आत्तापर्यंत विभागात आडसाली उसाच्या ३५ हजार २१७ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात पाऊस झाल्यास लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होईल. अन्यथा पुढील गळीत हंगामही अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे विभागात मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत धरणांमुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. मात्र, इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी उसाच्या लागवडी करतात. यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा चांगलाच खंड पडून अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी सोयाबीन, तूर, मूग अशा कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला. परिणामी ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र आहे. चांगला पाऊस झाल्यास ऊस लागवडी याच काळात एक लाखाहून अधिक क्षेत्रावर होतात.

यंदा सुरवातीच्या काळात कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी या काळात सुमारे ५१ हजार ६८० हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. यंदा त्या तुलनेत जवळपास १६ हजार हेक्टरने घट झाल्याचे दिसून येते. दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी चार लाख १३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्र आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत थोड्याफार प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर या तालुक्यांत काही प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. मुळशी, मावळ, वेल्हे, खेड या तालुक्यांत अजूनही उसाच्या लागवडी झालेल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, उत्तर सोलापूर या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, सांगोला, मंगळवेढा ही तालुके ऊस लागवडीपासून दूर असल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com