लागवड गोड ज्वारीची...
लागवड गोड ज्वारीची...

लागवड गोड ज्वारीची...

गोड ज्वारीच्या ताटांमध्ये शर्करा व प्रथिनांचे जास्त प्रमाण असते. शुष्क पदार्थांची पाचकता जास्त असल्यामुळे दुभत्या जनावरांना चारा फायदेशीर ठरतो. हेक्‍टरी ४० ते ४५ टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. गोड ज्वारीच्या दर्जेदार उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरित जातींची निवड करावी. चांगला निचरा असलेली जमीन निवडावी. ५.५ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत हे पीक घेता येते. चिकण, पोयट्याची मध्यम काळी जमीन लागवडीस योग्य असते. खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस, कारण या हंगामामध्ये जैविक उत्पादनक्षमता अधिक असते.

  • जमिनीची चांगली मशागत करून वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी प्रतिहेक्‍टरी दहा गाड्या शेणखत मिसळावे.
  • चांगला पाऊस झाल्यावर वाफसा येताच १५ जून ते १ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो. उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी.
  • हेक्‍टरी दहा किलो बियाणे वापरावे. अानुवंशिकतेनुसार शुद्ध बियाणे वापरावे. दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर  किंवा  अॅझोस्जिपिरिलीअम जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी. यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते.
  • संकरित व सुधारित जाती नत्रास चांगला प्रतिसाद देतात. १०० किलो नत्र (सव्वाचार गोण्या युरिया), ५० किलो स्फुरद (साडेसहा गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (पावणेदोन गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश) प्रतिहेक्‍टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
  • दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. ठेवावे.
  • पहिली विरळणी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी करावी.
  • खरीप हंगामात पावसाची तीव्रता पाहून गरज असल्यास एक ते दोन पाणी देण्यास हरकत नाही. पिकाचा जोमदार वाढीचा काळ (३० ते ३५ दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५५ ते ६० दिवस), फुलोऱ्यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) आणि दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. पाणी सारा पद्धतीने द्यावे.
  • दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. खुरपणी व कोळपणी पीक पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांपूर्वी करावी.
  • गोड ज्वारीच्या रसामध्ये इथेनॉलनिर्मितीसाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण १४ ते १६ टक्के असल्यामुळे त्याची प्रक्रिया ईस्ट सोबत करून इथॉनॉलनिर्मिती सहजरीत्या करता येते. गोड ज्वारी, ऊस व शुगरबीट या तीनही पिकांचा इथेनॉलसाठी वापर करावयाचा झाल्यास गोड ज्वारी तुलनात्मकदृष्ट्या योग्य आहे.

    गोड ज्वारी, ऊस आणि शुगरबीट यांची तुलना  

    गुणधर्म गोड ज्वारी ऊस शुगरबीट
    तयार होण्याचा कालावधी (दिवस) १२० ३६० १६०
    पाण्याची गरज (सें.मी.) ४० ३६० ८०
    खतांची गरज (नत्रःस्फुरदःपालाश) १००ः५०ः५० ३५०ः१२५ः१२५ १२०ः६०ः६०
    हिरव्या ताटांची उत्पादकता (ट/हे) ५० ७५ ७५

    इथेनाॅलची उत्पादकता (लि./हे)

    २०००  ६५०० ६०००

    गोड ज्वारीच्या जाती आणि वैशिष्ट्ये ः

  • हेक्‍टरी ४० ते ४५ टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन
  • खोडव्यापासून हेक्‍टरी ३० ते ३५ टन हिरवा चारा
  • ताटांमध्ये शर्करा व प्रथिनांचे जास्त प्रमाण. शुष्क पदार्थांची पाचकता जास्त, त्यामुळे दुभत्या जनावरांना चारा फायदेशीर
  • खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर व जिराईत म्हणून घेता येते.
  • खरीप आणि रब्बी हंगामातील साळलेल्या ताटांचे उत्पादन ३५ ते ४० टन प्रतिहेक्‍टरी
  • रसाचा ब्रिक्‍स १८ ते २१ डिग्री
  • प्रतिहेक्‍टरी १२ ते १५ हजार लिटर रस व त्यापासून अल्कोहोलनिर्मिती शक्य
  • रस काढल्यानंतरच्या चोथ्याचा जनावरांना खाद्यासाठी वापर
  • गोड ज्वारीच्या प्रसारित जाती ः एसएसव्ही ८४ ः

  • ही जात आयएस २३५६८ या जातीमधून निवड पद्धतीने संशोधित
  • ५० टक्के फुलावर येण्यास लागणारा कालावधी ः ८० - ८५ दिवस
  • पक्व होण्यास लागणारा कालावधी ः १२०-१२५ दिवस
  • झाडांची उंची ः २१० ते २३० सें.मी.
  • हिरव्या ताटांचे उत्पादन ः ३० ते ३५ टन/ हे.
  • विरघळलेले घनपदार्थ ः १८-२० डिग्री ब्रिक्‍स
  • क्षपणकारक शर्करेचे प्रमाण (रिड्युसिंग शुगर) ः १.० ते १.४ टक्के
  • अक्षपणकारक शर्करेचे प्रमाण (नॉनरिड्युसिंग शुगर) ः १३ ते १३.५ टक्के
  • एकूण शर्करेचे प्रमाण ः १४ ते १६ टक्के
  • धान्य उत्पादन ः १० ते १२ क्विं./ हे.
  • रस उत्पादन ः ८ ते १० हजार लि./ हे.
  • इथेनॉलचे प्रमाण ः ९ ते १० टक्के
  • इथेनॉलचे उत्पादन ः ९०० ते १००० लि./ हे.
  • सीएसव्ही १९ एसएस ः

  • एसएसव्ही ८४ पेक्षा १५ ते २० टक्के अधिक जैविक उत्पादन
  • आर.एस.व्ही. २ आणि एस.पी.व्ही. ४६२ यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे
  • ५० टक्के फुलावर येण्यास लागणारा कालावधी ः ७६-८० दिवस
  • झाडांची उंची ः २४० ते २७० सें.मी.
  • पक्व होण्यास लागणारा कालावधी ः ११५ ते १२० दिवस
  • हिरव्या ताटाचे उत्पादन (जैविक उत्पादन) ः ३५ ते ४० टन/ हे.
  • ब्रिक्‍स प्रमाण ः १८ ते २० डिग्री ब्रिक्‍स
  • रसाचे प्रमाण ः १० ते १२ हजार लि./ हे.
  • क्षपणकारक शर्करेचे प्रमाण (रिड्युसिंग शुगर) ः ०.९ ते १.२ टक्के
  • अक्षपणकारक शर्करेचे प्रमाण (नॉनरिड्युसिंग शुगर) ः १४ ते १६ टक्के
  • एकूण द्राव्य शर्करेचे प्रमाण ः १५ ते १७ टक्के
  • इथेनॉलचे प्रमाण ः ८ ते १० टक्के
  • इथेनॉलचे उत्पादन ः ९०० ते १२०० लि./ हे.
  • सी.एस.एच. २२ एसएस

  • राष्ट्रीय स्तरावर प्रसारित. संकरित जात आय.सी.एस.ए. ३८ आणि एस.एस.व्ही. ८४ यांच्या संकरातून विकसित
  • ५० टक्के फुलावर येण्यास लागणारा कालावधी ः ८२ - ८५ दिवस
  • पक्व होण्यास लागणारा कालावधी ः १२० ते १२५ दिवस
  • हिरव्या ताटांचे उत्पादन (जैविक उत्पादन) ः ४० ते ४५ टन/ हे.
  • विरघळलेले घनपदार्थ (ब्रिक्‍स) ः १८ ते २० डिग्री ब्रिक्‍स
  • क्षपणकारक शर्करेचे प्रमाण (रिड्युसिंग शुगर) ः १.० ते १.५ टक्के
  • अक्षपणकारक शर्करेचे प्रमाण (नॉनरिड्युसिंग शुगर) ः ११.२ ते १३.० टक्के
  • एकूण द्राव्य शर्करेचे प्रमाण ः १२.२ ते १३.० टक्के
  • धान्य उत्पादन ः १० ते १५ क्विं./ हे.
  • रस उत्पादन ः १२ ते १४ हजार लि./ हे.
  • इथेनॉलचे प्रमाण ः ८.३५ टक्के
  • इथेनॉलचे उत्पादन ः १००० ते १२०० लि./ हे.
  • इथेनॉलसाठी प्रसारित संकरित जात ः फुले वसुंधरा (आर.एस.एस.एच.- ५०)

  • गोड ज्वारीच्या ताटाचे सरासरी उत्पादन ः ५२.४ टन प्रतिहेक्‍टर. सी.एस.एस.एच.- २२ एस.एस. या तुल्य जातीपेक्षा २२.१ टक्क्यांनी (४२.९ टन/हे.) जास्त
  • रसाचे सरासरी उत्पादन १३,७९१ लिटर प्रतिहेक्टर. इथेनॉलचे उत्पादन १५०० लिटर प्रतिहेक्टर
  • शर्करेचे प्रमाण १८.६ टक्के
  • खोडमाशी, खोडकिडा या किडीस, तसेच पानांवरील रोगास प्रतिकारक्षम
  • खास इथेनॉलसाठी शिफारस
  • संपर्क ः ०२४२६ - २४३२५३ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com