आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
टेक्नोवन
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी यंत्र
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सीताफळाचा गर व बिया वेगळे करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो.
सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत नाही. काढणीनंतर बाजारपेठेत त्वरित विक्री होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना विक्रीची घाई असते. त्याचा फायदा घेऊन व किंचिंतही आवक वाढताच दरामध्ये प्रचंड घसरण होते. यामुळे सीताफळावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
प्रक्रियेमुळे बिगर हंगामात सीताफळाचा आस्वाद घेणे शक्य होते. सीताफळ प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने गराचा वापर केला जातो. सीताफळ गरापासून तयार केलेल्या मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड अशा पदार्थांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, सीताफळाचा गर आणि बिया वेगळे करण्यासाठी मजुरांचा वापर करावा लागतो. आजकाल मजुरांची उपलब्धता कमी असल्यामुळे मजुरीमध्ये वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे खाद्य पदार्थांशी संबंधित असल्यामुळे स्वच्छता हा घटक महत्त्वाचा असतो. अधिक माणसांचा वावर असल्यास स्वच्छता पाळणे तुलनेने अवघड होते. या सामान्य अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सीताफळाचा गर व बिया वेगळे करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो.
यंत्राची कार्यप्रणाली
- पिकलेल्या सीताफळांचे मधून दोन समान भाग करावेत. एका मोठ्या चमच्याने दोन्ही भागांतील गर बियांसहित काढून घ्यावा.
- बियांसहित वेगळा केलेला गर एका मोठ्या क्रेटमध्ये काढावा. आणि उरलेली साल किंवा टरफले वेगळी करून घ्यावीत.
- यंत्रामध्ये बियांसहित वेगळा केलेला गर टाकावा. यंत्रामध्ये गर आणि बिया वेगवेगळ्या झालेल्या दिसतील.
यंत्राची वैशिष्ट्ये
- हे यंत्र ०.५ अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारवर चालते.
- या यंत्राचा वापर सोपा असल्यामुळे अकुशल किंवा कुशल मजुराद्वारे चालवणे शक्य होते.
- यंत्रापासून प्रतितास ७०-८० किलो गर वेगळा करता येतो. गर वेगळे करण्याची प्रक्रिया जलद होते.
- यंत्राची गर वेगळा करण्याची क्षमता ९२-९६ टक्के आहे.
- गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी राहते. परिणामी गराची प्रत चांगली राहते.
गराची साठवणूक
- वेगळा केलेला गर जास्त काळ टिकून राहण्यासाठी गर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून डीप फ्रीजमध्ये उणे २० अंश सेल्सिअस तापमान साठवून ठेवावा.
- अस्कॉर्बिक आम्ल (२००० पीपीएम) किंवा पोटॅशिअम मेटा बायसल्फाईटचा (१५०० पीपीएम) वापर करून सीताफळ गर ६ महिन्यांपर्यंत टिकवता येतो.
संपर्क- ऋषिकेश माने, ९४०३१२९८७२
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
- 1 of 21
- ››