ग्राहकांची सेवा, वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य : ऊर्जामंत्री डॉ. राऊत

सुरळीत वीजपुरवठा व अचूक वीजबिलांसह ग्राहकसेवेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
Customer service, electricity bill recovery top priority
Customer service, electricity bill recovery top priority

मुंबई : गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरू आहे. सध्या महावितरण कंपनीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकी वसुली करणे आवश्यक आहे. त्याबाबत वीजग्राहकांना महावितरणची आर्थिक स्थिती समजावून सांगावी. सुरळीत वीजपुरवठा व अचूक वीजबिलांसह ग्राहकसेवेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात शुक्रवारी (दि. १) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सद्यःस्थितीत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच वीजदेयक व महसूल, वीजहानी, एएमआर मीटर, येत्या कालावधीतील सणासुदीचे दिवस व रब्बी हंगामामध्ये वीजपुरवठ्याचे नियोजन आदींचा आढावा घेण्यात आला. 

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, की राज्यातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच ग्राहकसेवेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीला आणखी गती देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

उच्चदाबासह २० केडब्ल्यूएपेक्षा अधिक वीजभार असलेल्या सर्व वीजजोडण्यांचे मीटर रीडिंग हे स्वयंचलित मीटर रीडिंग (एएमआर)द्वारे घेण्याची सूचना त्यांनी या वेळी केली. वीजबिलासंबंधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी नादुरुस्त मीटर बदलून देणे, देयक दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी आदी प्रक्रिया तत्परतेने करण्यात याव्यात. ग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे व त्यासाठी स्थानिक कार्यालयांनी दक्ष राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी व इतर वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निवारण करून त्यासंबंधीची माहिती त्यांना अवगत करण्यात यावी, असे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. 

या आढावा बैठकीस मुख्यालयातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर महावितरणचे क्षेत्रीय सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com