वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा 

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. यामुळे समुद्रातील पाण्याच्या उंच लाट उसळत असून, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई परिसरांत पावसासह वारे वेगाने वाहत आहे.
kokan damage
kokan damage

पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. यामुळे समुद्रातील पाण्याच्या उंच लाट उसळत असून, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई परिसरांत पावसासह वारे वेगाने वाहत आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक जोरदार वारे वाहत आहे. हे चक्रीवादळ आज (ता.१७) मुंबईजवळून जाणार असून, मंगळवारी गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी दुपारी ‘तौत्के’ वादळाचे केंद्र गोव्याच्या पणजीपासून पश्‍चिमेकडे १२० किलोमीटर, रत्नागिरी व राजापूरपासून १०२ किलोमीटर, मुंबईपासून दक्षिणेकडे ४२० किलोमीटर, तर गुजरातच्या वेरावळपासून ६६० किलोमीटर अंतरावर होते. या वादळाची तीव्रता आणखी वाढून मंगळवारी (ता.१८) पहाटेपर्यंत पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत. 

‘तौत्के’ वादळाच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे समुद्रात ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ७५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळ आणि पावसामुळे घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीपिके आणि फळझाडांनाही फटका बसणार आहे. वादळ प्रभावित भागात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  आज मुंबईजवळून जाणार  आज (सोमवारी) सकाळी हे चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास २०० किलोमीटर अंतरावरून गुजरातच्या दिशेने सरकेल. महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे दिशेने वाटचाल करत असलेले हे वादळ मंगळवारी गुजरातच्या पोरबंदरजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  वादळाचा परिणाम 

  • रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दोन दिवसांपासून पाऊस 
  • विजेचे खांब कोसळून पडून वीजपुरवठा खंडित 
  • झाडे रस्त्यांवर पडून वाहतूक ठप्प 
  • सिंधुदुर्गमध्ये ४० घरांचे नुकसान 
  • तीन शाळांचे नुकसान झाले. 
  • नगर, औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यांत पाऊस 
  • पुणे जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com