परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात १ लाख ९४ हजार ८९ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या (२०१८) सप्टेंबरच्या तुलनेत यंदा या महिन्यातील दूध संकलनात ३ लाख ९४ हजार ४९४ लिटरने घट झाली. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर एवढे दूध संकलन झाले.
दुष्काळी स्थितीमुळे उद्भवलेली चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, पेमेंट मिळण्यास लगत असलेला विलंब आदी कारणांनी दूध व्यवसाय बंद पडत असल्यामुळे दुग्ध संकलनात घट होत आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात येथील दुग्ध शाळेत परभणी, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, नांदेड येथील शीतकरण केंद्रातून एकूण ९ लाख ७३ हजार ७१९ लिटर दूध संकलन झाले होते.
सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर दूध संकलन झाले. यामध्ये परभणी येथील शीतकरण केंद्रांतील २ लाख ९२ हजार ६०२ लिटर, पाथरी येथील २ लाख ६२ हजार ३१६ लिटर, गंगाखेड येथील १ लाख ३६ हजार ९८५ लिटर, हिंगोली येथील ५९ हजार ४६५ लिटर, नांदेड येथील २७ हजार ५१७ लिटर दुधाचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात नांदेड वगळता अन्य ठिकाणच्या दूध संकलनात घट झाली.
नांदेड जिल्ह्यातून ऑगस्ट महिन्यात २० हजार ३४८ लिटर, सप्टेंबर महिन्यात २७ हजार ५१७ लिटर दूध संकलन झाले. गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १० लाख १९ हजार ७८८ लिटर, सप्टेंबर महिन्यात ११ लाख ७९ हजार १२४ लिटर दूध संकलन झाले. गतवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ३ लाख ९४ हजार ४९४ लिटरने घट झाली. २०१९ -२० या आर्थिक वर्षात दुधाचे पेमेंट मिळण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे.
सहकारी दूध उत्पादक संस्थाचे कमिशन तसेच वाहतूक खर्चीचे बिल थकीत आहे. याशिवाय चाराटंचाई, चारा, सरकी पेंडीच्या दरात वाढ झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विक्री करून दुग्ध व्यवसाय बंद केले. त्यामुळे दूध संकलनात दर महिन्यात घट होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.