राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना कोकण, पुणे विभागवगळता उर्वरीत राज्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. शुक्रवारी (ता.१४) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान ३२६७ प्रकल्पांमध्ये ९६१.०२ टीएमसी (६७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा स्थिती अत्यंत चिंताजनक असून, जायकवाडी वगळता उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे तर विदर्भातही यंदा ५० ते ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

पूर्व मोसमी पावसापाठोपाठ यंदा मॉन्सूनच्या पावसाचे दणक्यात आगमन झाले. मात्र जुलै महिन्यात पावसाने दिलेली ओढ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होती. त्यानंतर मात्र सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने दणक्यात हजेरी लावली. राज्यातील बहुतांशी धरणे याच भागात असल्याने ही धरणे तुडुंब भरून वाहिली. त्यामुळे उजनी धरण भरले तर जायकवाडीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. मराठवाड्यातील इतर धरणे पावसाअभावी अद्यापही तळाशी गेलेली आहेत. राज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७७०.५२ टीएमसी (७५ टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये १०३.९० टीएमसी (५४ टक्के) तर २ हजार ८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८६.६४ (३८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मराठवाड्यात चिंताजनक स्थिती पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून ७५.४१ टीएमसी म्हणजेच अवघा २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा काही प्रमाणात वाढला. धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ६१.४३ टीएमसी (६० टक्के) पाणीसाठा झाला आहे. मात्र माजलगाव, मांजरा (बीड) या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, येलदरी धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे. मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ५२.३२ टीएमसी (३३ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ८.९३ टीएमसी (२४ टक्के), तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे ‘ओव्हर फ्लाे’ झाल्याने मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यामुळे सोलापूरातील उजनी धरण १०० टक्के भरले, तर कोयनेतही मुबलक पाणीसाठा झाला. अनेक धरणे पूर्ण भरल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधील पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील सर्व ७२५ धरणांमध्ये मिळून सध्या ४३२.६२ टीएमसी (८१ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४२३.८७ टीएमसी (९६ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये ३०.४२ टीएमसी (६३ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १४.५८ टीएमसी (२९ टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे.

नाशिक विभागात पाणीसाठा वाढला नाशिक विभागात पावसाळ्याच्या सुरवातील पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने पाणीसाठा चिंताजनक स्थितीत होता. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने त्यात समाधानकारक वाढ झाली. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळंवडे धरणासह अनेक लहान-मोठ्या धरणांतून पाणी साेडण्यात आले आहे. विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १३७.०१ टीएमसी (६५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये १०२.८४ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १९.२४ टीएमसी (४६ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.९३ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा आहे.

कोकणात ९३ टक्के पाणीसाठा कोकणात जून, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. मुंबईसह शहरी भागाला पाणीपुरवठा करणारे सर्वच प्रकल्प आेसंडून वाहिले आहेत. कोकणात सर्व १६२ धरणांमध्ये मिळून यंदा ११५.०६ टीएमसी (९३ टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. ठाण्यातील भातसा, पालघरमधील कवडास, धामनी, सिंधुदुर्गमधील तिलारी प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ८३.११ टीएमसी (९६ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १६.०६ टीएमसी (९३ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १५.९२ टीएमसी (८० टक्के) पाणीसाठा आहे.

विदर्भात जेमतेम निम्माच पाणीसाठा गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने तळ गाठलेल्या विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये यंदा जोरदार पाऊस पडूनही जेमतेम ५० टक्केच पाणीसाठा झाला आहे. पूर्व विदर्भातील गोसी खुर्द (४० टक्के) कामठी खैरी (४१ टक्के), तातेलाडोह (२८ टक्के) धरणांमध्ये अजूनही अपुरा पाणीसाठा आहे. तर पश्‍चिम विदर्भातील उर्ध्व वर्धा (४८ टक्के) वगळता इतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ८१.९८ टीएमसी (५० टक्के), तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ८२.७२ टीएमसी (५६ टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. पूर्व विदर्भातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५४.१६ टीएमसी (४४ टक्के) तर अमरावती विभागातील मोठ्या १० प्रकल्पात ५४.२६ टीएमसी (६२ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.  

राज्यातील प्रकल्पांमधील १४ सप्टेंबरपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा   शिल्लक साठा   टक्केवारी
अमरावती  ४४५ १४८.००  ८२.७२ ५६
कोकण १७६ १२३.९२ ११५.०६ ९३
नागपूर  ३८४ १६२.६५ ८१.९८   ५०
नाशिक ५७१  २११.९७ १३७.०१  ६५
पुणे  ७२६ ५३७.०१ ४६८.८८ ८७
मराठवाडा ९६५ २६०.३३ ७५.४१ २९
एकूण ३२६७ १४४३.८८ ९६१.०२ ६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com