पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये २१०.२३ टीएमसी पाणीसाठा

घोड धरणातून सुरु असलेला विसर्ग
घोड धरणातून सुरु असलेला विसर्ग

पुणे  : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहिली. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंत उजनीसह, पुणे जिल्ह्यातील सर्व २६ धरणांमध्ये मिळून २१०.२३ टीएमसी (९७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोऱ्यातील माणिकडोह, पिंपळगाव जोगे ही धरणे वगळता जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली आहे.   

उजनीसह पुणे जिल्ह्यातील प्रमुख २६ धरणांची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१७.५४ टीएमसी आहे. गतवर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या झळा यामुळे धरणांतील चल पाणीसाठा ४ टक्क्यांपर्यंत खालावला होता. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने ही धरणे ओसंडून वाहिली. पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. 

जुलै महिन्याच्या सुरवातीला उजनी धरणातील पाणीसाठा उणे ६० टक्क्यांपर्यंत गेला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरण १०० टक्के भरले. उजनी धरणात चल साठा ५३.५८ टीएमसी, तर अचल साठ्यात ६३.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. भीमा नदीच्या खोऱ्यातील धरणांमधून पाण्याचा कमी-अधिक विसर्ग सुरू असल्याने उजनीत पाण्याची आवक सुरूच आहे. परिणामी उजनी धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागत आहे. 

कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये ३२.३४ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे. यात माणिकडोह धरणात ७९, तर पिंपळगाव जोगे धरणात ७७ टक्के पाणीसाठा आहे. मुठा खोऱ्यातील खडकवासला धरणसाखळीत २९.१५ टीमएसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. मुळा खोऱ्यातील पवना, मुळशी धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ४६.७३ टीएमसी (९७ टक्के) पाणी आहे. नाझरे धरणातही ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. 

मंगळवारी (ता. १३) जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) कंसात टक्केवारी : टेमघर ३.७१ (१००), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), पवना ८.०८ (९५), कासारसाई ०.५४ (९४), मुळशी १८.४६ (१००), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ७.५८ (१००), भामा आसखेड ७.५६ (९९), आंद्रा २.९२ (१००), वडीवळे १.०७ (१००), गुंजवणी ३.५४ (९६), भाटघर २३.२६ (९९), नीरा देवघर ११.४३ (९७), वीर ८.५० (९०), नाझरे ०.५७ (९७), पिंपळगाव जोगे ३ (७७), माणिकडोह ८.०२ (७९), येडगाव १.९४ (१००), वडज १.१० (९४), डिंभे १२.२९ (९८), चिल्हेवाडी ०.६३ (६५), घोड ५.३७ (९८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com