संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’

पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा खंड असतानाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडल्याने निम्म्याहून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. या धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागल्याने नद्या दुथडी भरून वाहत असून, उजनी धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. उजनीसह जिल्ह्यातील धरणांची एकूण उपयुक्त क्षमता २१८.४० टीएमसी असून, शनिवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून सुमारे १७४.२५ टीएमसी (८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्यातील कळमोडी, चासकमान, वडिवळे, आंद्रा, पवना, मुळशी, खडकवासला, पानशेत, वरसगाव, निरा देवघर, भाटघर, वीर ही धरणे १०० टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. कुकडी खोरे वगळता बहुतांशी धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सांडवा आणि कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.

यात येडगाव धरणातून १४०८ क्युसेक, वडज १४२७, डिंभे धरणातून ५८०, घोड धरणातून ५६५, कळमोडी धरणातून ७२०, चासकमान धरणातून ६ हजार २३, वडिवळे धरणातून २७५, अांद्रा धरणातून ५१६, पवना धरणातून ३६०८, कासारसाई धरणातून १५०, मुळशी धरणातून ४ हजार ३२२, टेमघर धरणातून ७७६, वरसगाव धरणातून २ हजार ६९०, पानशेत धरणातून २ हजार ९३१, खडकवासला धरणातून ११ हजार ६७६, निरा देवघर धरणातून ३ हजार ३६६, भाटघर धरणातून ३ हजार ११६, वीर धरणातून १६ हजार २८८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुणे, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण जवळपास निम्म भरले असून, भीमेच्या खोऱ्यातून होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीपातळी वाढतच आहे. उजनी धरणामध्ये २५.७४ टीएमसी (४८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. अचल साठा विचारात घेता उजनीमध्ये ८९.३९ टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या (११७.२१ टीएमसी) ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणातून सुमारे ४ हजार १५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्गही सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com