नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग कारखान्यावर

नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग कारखान्यावर
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग कारखान्यावर

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात अधिक आर्द्रतेचा (ओलावा) कापूस खरेदी करून सरकी, रुईचे नुकसान झाल्यास आपला केंद्रप्रमुख व संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या संचालकास नुकसान भरपाई देण्यासंबंधी फतवा काढला आहे. अर्थातच सध्या अधिक आर्द्रतेचा कापूस येत असल्याने सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना विलंब झाला आहे. दुसरीकडे राज्यात कापसाला कुठेही हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून तातडीने हस्तक्षेप करून कापूस खरेदी सर्वत्र सुरू करावी, आपले नियम, मापदंड काहीसे शिथिल करावेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.  दिवाळीनंतर सीसीआयकडून राज्यभरात मागील हंगामात कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदाही नोव्हेंबरच्या सुरुवातीला कापूस खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे ओली झाली. कापसाचा दर्जा घसरून नुकसान झाले आहे. या स्थितीत आपल्याला हव्या त्या दर्जाचा कापूस मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी केंद्रांबाबत विलंब केल्याची माहिती आहे.  शिरपूर (जि.धुळे) येथे सीसीआयने काही दिवसांपूर्वी कापूस खरेदी सुरू केली. सीसीआयला आठ टक्के आर्द्रतेचा कापूस खरेदी करायचा आहे. तसेच एक क्विंटल कापसात ६३ किलोपर्यंत सरकी मिळणे अपेक्षित आहे. शिरपूर येथील केंद्रात २५ टक्के आर्द्रतेचा कापूस येत होता. या कापसातून रुई व सरकी वेगळी केल्यानंतर सरकीची विक्री लागलीच होणे अपेक्षित आहे. परंतु सरकीमध्ये १२ टक्केच आर्द्रता सीसीआयला अपेक्षित आहे. परंतु सरकीमध्येदेखील ३० टक्के आर्द्रता दिसून येत आहे. अशा सरकीचे वजन घटून एका क्विंटलला फक्त ५० किलो सरकी मिळते. तर वातावरण ढगाळ, पावसाळी राहिले तर ३० टक्के आर्द्रतेच्या सरकीचे नुकसान होते. अशी सरकी लाल, काळी पडते. ती ऑइल मिलमालक खरेदी करीत नाहीत. मग या नुकसानीस संबंधित खरेदी केंद्रात नियुक्त केलेला सीसीआयचा केंद्रप्रमुख किंवा अधिकारी व संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखानाचालक यांना जबाबदार धरले जात आहे. नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागेल, या भीतीने शिरपूर येथील केंद्रातील कापूस खरेदी मागील आठवड्यात बंद करण्यात आली. जळगाव येथेही केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीसीआयच्या वरिष्ठांनी केंद्रप्रमुख, जिनींग प्रेसिंग कारखानाचालक यांना दिल्या होत्या. सीसीआयच्या मापदंडानुसार कापसाचा दर्जा नसल्याने जळगावच्या केंद्रात कापूस खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  सीसीआयला आपल्या मापदंडानुसार हवा असलेला कापूस डिसेंबरमध्ये मिळू शकेल. त्यासाठी निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज आहे. परंतु मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. वातावरणात आर्द्रता अधिक वाढते. यामुळे सीसीआयची नियोजित सर्वच केंद्र कापूस खरेदीसाठी खानदेशात सुरू होणार नसल्याची माहिती आहे. 

बाजारातील दरांवर दबाव सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असती तर खासगी बाजारातील दरांवरील दबाव दूर झाला असता. परंतु सीसीआयची खरेदी कापसाच्या दर्जाच्या मुद्यामुळे लांबल्याने बाजारातील दरांवर काहीसा दबाव आहे. कापसाची खेडा खरेदी अजूनही हव्या त्या वेगात सुरू नसल्याचे बाजारातील विश्‍लेषक, व्यापारी सांगत आहेत. 

आम्हाला नुकसानीची भीती, शेतकऱ्यांचे हित पाहावे आम्हाला जळगावचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी सीसीआयने दिल्या होत्या. परंतु सीसीआयला अगदी कोरडा (आठ टक्के आर्द्रता) कापूस हवा आहे. तसा कापूस माझ्या मते मार्चमध्ये मिळेल. कारण आपल्याकडे सध्या वातावरणात आर्द्रता, गारवा आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे घरात साठविलेल्या कापसाचा दर्जाही हवा तसा नाही. सीसीआयच्या मापदंडानुसार कापसाची खरेदी केंद्रात झाली नाही व नुकसान झाले तर त्यास संबंधित केंद्रप्रमुख व जिनिंग प्रेसिंग कारखाना जबाबदार असेल, असा नियम सीसीआयने लागू केला आहे. यामुळे आम्ही आमच्या केंद्रात कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. सध्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. परंतु शेतकरी हित शासनाने लक्षात घेतले पाहिजे, असे सीसीआयचे खरेदी केंद्रधारक अविनाश भालेराव (जळगाव) यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com