पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे जिल्ह्यातील ४० हजार ७४५ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, हे मोठे नुकसान झाले असल्याचे नजर अंदाज अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतच्या नजर अंदाज अहवालाची माहिती नुकताच सादर केली आहे. त्यातून हे नुकसानग्रस्त क्षेत्र स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा अहवाल तयार केला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सुमारे २२ हजार ४०० हेक्टरवरील जिरायत, बागायत क्षेत्रावरील पिके, फळपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दुसऱ्या वर्गात शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात खरिपाचे एकूण दोन लाख ९३ हजार २९१ हेक्टर क्षेत्र आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर तालुक्यातील ६३२ गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे चार हजार ६८६ हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ ३३०९ हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. दोन हजार ४३४ हेक्टरवरील भुईमुगाचे, एक हजार ३१ हेक्टरवरील कांद्याचे, एक हजार २६७ हेक्टरवरील द्राक्षाचे, १९५ हेक्टरवरील डाळिंबाचे, १२ हेक्टरवरील केळीचे, ८७ हेक्टरवरील मक्याचे, १४१ हेक्टरवरील बाजरीचे, २०२ हेक्टरवरील बटाटा पिकाचे, २९९ हेक्टरवरील उसाचे, ८१६ हेक्टरवरील तृणधान्याचे, ४९ हेक्टरवरील गळीतधान्याचे, ३०२ हेक्टरवरील फुलपिकांचे आणि भाजीपाल्याचे सात हजार २५१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात सुमारे १५ हजार ३६ हेक्टरला पावसाचा फटका बसला आहे. सध्या अनेक ठिकाणी पंचनामे सुरू असून लवकरच किती नुकसान झाले याची नेमकी माहिती समोर येईल. त्यानंतर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर करून नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com