Damage to crops on 66,000 hectares in Vidarbha
Damage to crops on 66,000 hectares in Vidarbha

विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या तीन दिवसांत पावसाने जोरदार फटकेबाजी केली. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्हादेखील याला अपवाद नव्हता. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १.४, बुलडाणा निरंक, चंद्रपूर ६.४, गडचिरोली निरंक, गोंदिया १२०.२, नागपूर १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वर्धा, वाशीम, यवतमाळ या तीनही जिल्ह्यात पाऊस नव्हता. शनिवारी विदर्भात सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली.

नागपूर विभागातील वर्धा जिल्हा वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात केवळ ४१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या संदर्भाने दुजोरा दिला.

कृषी विभागाने पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. कृषी आयुक्तालयाला हा अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २९५ गावांत २२ हजार २३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ३० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे. अकोला जिल्ह्यात ३२५ गावांमध्ये ३३ हजार ७९८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांत १३४ गावांमध्ये नुकसान झाले असून, ६९६९.५० हेक्टर क्षेत्र आहे. या जिल्ह्यात ३४२ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. बुलडाणा जिल्ह्यात तालुक्यात नुकसान झाले आहे. बाधित गावांची संख्या अकरा असून, ५९४ क्षेत्रावरील पीक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

वाशीममध्ये अडीच हजार हेक्टरला फटका वाशीम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ४६ गावांमध्ये २ हजार ६७१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com