औरंगाबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान

औरंगाबाद : धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत असलेल्या नागमठानमधील विसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्‍यांतील नदीकाठच्या जवळपास २५ गावशिवारांत नदीपात्र सोडून पाणी पिके आणि घरांत घुसण्यास सुरवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून रविवारपासून (ता. ४) लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास गती देण्यात आली आहे. परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून आपत्ती निवारण पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली. 

नांदूर मध्यमेश्‍वरमधून रविवारी (ता. ४) २ लाख ८० हजार क्‍युसेकच्या पुढे विसर्ग करण्यात आला. परिणामी सोमवारी (ता. ५) औरंगाबाद जिल्ह्यात दिसणे सुरू झाले. आधी दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीने काही ठिकाणी पात्र सोडून वाहने सुरू केले आहे. वैजापूर तालुक्‍यात नदीकाठापासून जवळपास एक ते दीड किलोमीटरपर्यंतच्या परिसराला पाण्याने व्यापले. नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भागात होत जोरदार पाऊस होत आहे. त्याचा परिणाम म्हणून नांदूर मध्यमेश्‍वरमधून वाढत असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व पैठण तालुक्‍यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तालुका व उपविभाग स्तरावरील अधिकारी पुराचा धोका असणाऱ्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न करीत होते. २००६ मध्ये नांदूर मध्यमेश्‍वरमधून झालेल्या पाण्याचा विसर्गामुळे सोमवारी (ता. ५) गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी वेगाने वाढत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्‍यात महालगाव गटातील नागमठाण, बाजाठाण, अव्वलगाव, हमरापूर, शनिदेवगाव, चेंडूफळ, चांदेगाव आदी गावशिवारासह वैजापूर तालुक्‍यातील जवळपास सतरा गावशिवारांत पाणी घुसले. त्यामुळे अनेक घरे व शेतीपिके पाण्याखाली गेली. नागमठाण शिवारात रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जवळपास दोनशे हेक्‍टर कपाशी, तूर, सोयाबीन, मुगाचे पीक पाण्याखाली गेले. कायगाव शिवारातील नदीकाठावरील शेकडो एकरांतील खरीप पिके पाण्याखाली गेली.

शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीला तोंड देऊन पिकांवर केलेला खर्च पाण्यात गेला. तीन बोटींसह धुळ्यावरून आलेल्या आपत्ती निवारण पथकातील ३६ जवान पूरग्रस्तांची मदत करीत आहेत. शिवाय जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकातील ५० ते ६० लोक विविध आघाड्यांवर आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी कार्यरत आहेत. 

पुणे येथूनदेखील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकालाही बोलावण्यात आले असून, त्या पथकातील जवळपास ३६ जवान तीन बोटी व इतर साहित्यासह दाखल होतील. त्यानंतर त्यांच्या परिस्थितीनुरूप मदतीच्या कार्याला सुरवात होईल, अशी माहिती नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली.

१६३ लोक सुरक्षितस्थळी

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्‍यातील १७ पुरप्रभावीत गावांमधील लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. वैजापूर तालुक्‍यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बापतारा, वांजरगाव, शिंदे वस्ती, पुरणगाव आदी गावातील तीनशे पेक्षा अधिक लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अमळनेर, लखमापूर, कायगाव आदी गावातील ३२ पेक्षा अधिक कुटूंबांतील १६३ पेक्षा जास्त लोकांना पुरस्थितीमुळे सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. बचाव कार्य अजूनही सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली.

२३ गावांचा वीजपुरवठा बंद

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यातील गोदावरी काठच्या २३ गावांमधील वीजपुरवठा रविवारी (ता. ४) रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्‍यात नदीकाठच्या वस्त्यांवरील काही घरे वगळता सर्व गावांचा विद्युतपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली. पूरस्थितीमुळे वैजापूर व गंगापूर तालुक्‍यातील ८ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २२ उच्च दाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, ६५८ रोहित्रांवरील ५ हजार ५६ ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे आदेशही अभियंते व कर्मचाऱ्यांना महावितरणतर्फे देण्यात आले आहेत. पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरील वीजसंच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com