हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा नुकसान
नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कसमादे भागातील शेवगा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नुकसान झाले होते.
नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कसमादे भागातील शेवगा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरले. तोच गत सप्ताहात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मालेगाव व सटाणा तालुक्यातील शेवगा लागवडीत मोठ्या प्रमाणात फूलगळ झाली. झाडे उन्मळून पडली. पावसामुळे शेंगा लाल पडल्या. सलग दोन महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेवगा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नैसर्गिक धोके वाढत असल्याने मालेगाव, सटाणा, देवळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेवगा पिकाकडे मोर्चा वळविला. त्यातून क्षेत्राचा विस्तारही झाला आहे. मालेगाव तालुक्यातील दुष्काळी भागात लागवडी अधिक होत आहेत. मात्र या अस्मानी संकटांमुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अवकाळी पाऊस व गारांच्या तडाख्यात फांद्या व शेंगांना फटका बसला. मोठ्या प्रमाणावर जखमा दिसून येत आहेत.
हिवाळी बहरातील तयार माल काढणीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र पावसाच्या मारामुळे शेंगा लाल पडल्याने प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी दुबार छाटण्या तयारीत आहेत.
‘उत्पादनावर परिणाम; पुरवठ्यात घट’
सध्या दव पडत असल्याने तयार शेंगा लाल पडत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. मालाचा तुटवडा असून बाजारात सध्या मागणी असूनही पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे चांगली प्रतवारी असलेल्या शेंगांना प्रतिकिलो ५० ते ६०रुपये दर मिळत आहे, असे पवारवाडी (ता. मालेगाव) येथील शेतकरी महेश पवार यांनी सांगितले.
सध्या उन्हाळी बहर धरला होता. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेंगा, फूलगळ झाली आहे. त्यामुळे आगामी नियोजन कोलमडले आहे.
- देविदास देवरे, शेतकरी, वडगाव, ता. मालेगाव.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळीमुळे नुकसानीचे प्रमाण वाढले. सरकारने शेवगा पिकाला देखील पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- मनोहर खैरनार, शेतकरी, डोंगराळे, ता. मालेगाव.