शेळ्यांसाठी दशरथ घास

दशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीमध्ये देखील हे पीक उत्तम येते. हे चारा पीक बहुवार्षिक असल्यामुळे कमीत कमी पाच वर्ष जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळतो.
 dashrath grass
dashrath grass

दशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीमध्ये देखील हे पीक उत्तम येते. हे चारा पीक बहुवार्षिक असल्यामुळे कमीत कमी पाच वर्ष जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळतो. दशरथ घास हे द्विदल वर्गातील चारा पीक आहे. हा चारा हिरवागार, कोवळा, लुसलुशीत सकस असतो. हे चारा पीक बहुवार्षिक असल्यामुळे कमीत कमी ५ ते ८ वर्ष जनावरांना हिरवा चारा मिळण्यास मदत होते. या पिकाच्या मुळावर रायझोबियम या जिवाणूच्या गाठी असल्यामुळे जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहते. हे पीक २ ते ३ मीटर सरळ उंच वाढत असून याच्या खोडाचा भाग हा काष्टमय असतो. कमी जास्त प्रमाणात जरी जनावरास खावयास दिले तरी याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम जाणवत नाही. त्याचबरोबर हिरवळीचे खत म्हणून देखील याचा वापर करतात. योग्य नियोजन करून लागवड केल्यास हेक्टरी ७० ते ८० टन हिरवा चारा मिळतो. लागवड तंत्र

  • हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन उपयुक्त, जमिनीचा पाण्याचा निचरा करण्याची क्षमता चांगली असावी. क्षारयुक्त जमिनीमध्ये देखील हे पीक उत्तम येते.
  • जमिनीची मशागत करत असताना दोन कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. सारा यंत्राच्या मदतीने ४ ते ५ मीटरच्या रुंद सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्याची लांबी ही आपल्या निवडीनुसार ठेवावी. दाताळ्याचा वापर करून वाफे चांगले करावेत.
  • पेरणी ही जून - जुलैच्या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. फोकून पेरणी करावयाची असेल २० ते २५ किलो बियाणे लागते.
  • बियाणे कवच कठीण असल्यामुळे याच्या उगवणीवर परिणाम होतो. त्यामुळे यास गरम पाण्याची प्रक्रिया करावी. साधारणपणे चार लिटर पाण्यात एक किलो बियाणे घ्यावे. पाण्यावर तरंगत असलेले बियाणे बाजूला काढावे. बाकी राहिलेले बियाणे हे उकळी आलेल्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावे. त्यानंतर बियाणे हे काढून थंड पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे बियाणे फुगलेले दिसेल. असे बियाणे गोणपाटावर सावलीला पसरून सुकवल्यानंतर जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रिया करावी. यासाठी एका किलो बियाण्यास ५ मिलि रायझोबियम जिवाणू संवर्धक पुरेसे होते.
  • लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळून द्यावे. हेक्टरी २० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २० किलो पालाशची मात्रा द्यावी.स्फुरद व शेणखताचा मात्रा दिल्यास चाऱ्याचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • पिकाची पहिली कापणी पीक ६० ते ७० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या या महिन्याला केल्या तरी चालतील. कापणी करत असताना जमिनीपासून ३० सेंमी वर कापणी करावी म्हणजे फुटवे परत फुटण्यास काहीच अडचण येणार नाही.
  • प्रती हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हे ७० ते ८० टन मिळते. साधारणपणे जनावरांना हिरवा चारा कोवळा व लुसलुशीत असल्यामुळे खाऊ घालणे सोपे असते. वाळलेला चारा खाऊ घालता येत नाही, कारण याची पानेच खूप लहान असतात.
  • पौष्टिक चारा

  • हिरव्या चाऱ्यामध्ये १८ - २१ टक्के प्रथिने, ९ टक्के स्निग्धपदार्थ, १.९ टक्के खनिजे, ३७.७ टक्के कर्बोदके असतात.
  • कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम,सोडीयम देखील पुरेशा प्रमाणात असतात.
  • हिरवागार, कोवळा, लुसलुशीत सकस चारा.
  • संपर्क - के. एल.जगताप,९८८१५३४१४७ (कृषि विज्ञान केंद्र, खामगाव,जि.बीड,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com