‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी मुदतवाढ 

राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना आता २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनसाठी प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार आहे.
gram
gram

पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना आता २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनसाठी प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार आहे.  बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. बियाणे अनुदान सर्व जिल्ह्यांत सरसकट मिळणार नाही. विशिष्ट बियाण्यांसाठी विशिष्ट जिल्ह्यांत अनुदान मिळेल. नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत भातासाठी, तर कडधान्यासाठी सर्व जिल्ह्यांत अनुदान मिळेल.  भरडधान्य (मका) पिकासाठी नाशिक, धुळे, जळगाव,नगर, सांगली, औरंगाबाद, जालना; तर पौष्टिक तृणधान्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनुदान मिळेल.  गळीतधान्य अनुदानासाठी नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, तर कपाशी बियाण्याकरिता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, नगर, धुळे, जळगावचा समावेश आहे. 

मका, बाजरीला १०० रुपये अनुदान  पिकानुसार निवडलेल्या संबंधित जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो २० रुपये प्रति किलो, १० वर्षांवरील वाणास दहा रुपये अनुदान मिळेल. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये मिळतील. मात्र संकरित मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास १०० रुपये मिळणार आहेत. 

पीक प्रात्यक्षिकांसाठीही अनुदान  पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण रसायनांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. यात कृषी विद्यापीठांच्या सल्ल्याने तयार होणारे जिल्हानिहाय पूर्ण पॅकेज शेतकऱ्याला वापरणे अनिवार्य असेल. 

ऑनलाइन लॉटरीत निवडलेल्या शेतकऱ्याला तूर, मूग, उडदापैकी एका पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनी किट मिळणार आहे. यात प्रति चार किलोच्या तुरीच्या कीटसाठी ४१२ रुपये, मुगासाठी ४०७ रुपये, उडदासाठी ३४९ अनुदान असेल. बियाणे मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम मात्र शेतकऱ्यांनी द्यावी लागणार आहे. 

शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना नोंदणीबाबत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.  बियाणे मिनी किट चार किलोचे  सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनी किट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य असेल. तुरीच्या मिनी किटसाठी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, नगर, नाशिक, सोलापूर, तर मुगासाठी जळगाव, धुळे, नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, तसेच उडदासाठी नगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे.  सोयाबीनला मिळणार १२ रुपये  ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो ३० रुपये, १० वर्षांवरील वाणास १५ रुपये मिळतील. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान दिले जाईल, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com