वाशीममध्ये पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

वाशीम: ‘‘जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील सहा पिकांना विमासंरक्षण मिळणार आहे.
Deadline for crop insurance in Washim till 31st July
Deadline for crop insurance in Washim till 31st July

वाशीम : ‘‘जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील सहा पिकांना विमासंरक्षण मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा पीकविमा योजनेत समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने, भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमाहप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामूहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सातबारा, आधार कार्ड, पीक पाहणी झाली असल्यास पिकांच्या पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.

यालाही मिळणार भरपाई

पंतप्रधान पीकविमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर विमासंरक्षण लागू करण्यात आले आहे. पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादीमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाचे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे होतील. नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसानभरपाई ठरविली जाईल. जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकांच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर सर्व अधिसूचित विमा क्षेत्र हे त्या मदतीसाठी पात्र राहील.

नुकसानीची माहिती वेळेत देणे आवश्यक

या योजनेसाठी पुढील तीन वर्षांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास त्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय संस्था, विमा कंपनी, कृषी किंवा महसूल विभागास टोल फ्री नंबरद्वारे कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे, असेही तोटावार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com