वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती मिळणार : पालकमंत्री देसाई

वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती मिळणार : पालकमंत्री देसाई
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती मिळणार : पालकमंत्री देसाई

वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यानुसार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख नऊ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना सुमारे ७७७ कोटी २३ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार बांधव, अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. श्री. देसाई पुढे म्हणाले,  ‘‘गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने १७९ कोटी ९९ लाख रुपये मदत वितरीत केली आहे. २ लाख २० हजार ९८४ शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप झाले आहे. जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे.’’ शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ केले असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी भागभांडवल म्हणून सरकारने साडे तीन हजार कोटी रुपये अतिरिक्त निधी दिला आहे. या महामार्गाचा सुमारे ९७ किलोमीटरचा टप्पा जिल्ह्यातून जातो. शेतमालाच्या वाहतुकीसाठी, दळणवळणासाठी ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com