कोल्हापूरला ३९१ कोटी रुपयांवर कर्जमाफी : पालकमंत्री पाटील

Debt waiver to Kolhapur at Rs 391 crore : Guardian Minister Patil
Debt waiver to Kolhapur at Rs 391 crore : Guardian Minister Patil

कोल्हापूर : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील ५७ हजार १९६ शेतकऱ्यांना ३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळणार आहे,’’ अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सूरमंजिरी लाटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना एकूण ३२१ कोटी ४५ लाखाहून अधिक मदत वाटप केली आहे. अद्यापही उर्वरित लाभार्थ्यांना अनुदानवाटप प्रक्रिया सुरु आहे.  पूरबाधित लोकांना देय असणारी सर्व मदत विनासायास व तात्काळ देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे ७८ हजार २२८ हेक्टरवरील तीन लाखांवर शेतकरी, तर अवकाळी पावसामुळे १५८४  हेक्टरवरील ७८६१ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना रोख स्वरुपातील १६० कोटींची मदत, तर २९५ कोटींची मदत कर्जमाफीद्वारे सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे.’’

‘‘१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची ३० सप्टेबर २०१९ रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेली व परत फेड न झालेली रक्कम २ लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येईल,’’ असेही पाटील यांनी सांगितले.

कर्जमुक्त करून खरिपासाठी पीककर्ज देणार

३१ मे २०२० पूर्वी या योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून खरीप पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com