बनावट पावत्यांद्वारे फसवणूक टळणार

crop insurance
crop insurance

मुंबई: पीकविमा भरल्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या वाढत्या घटनांना आता कृषी खात्याच्या पुढाकाराने चाप लागणार आहे. विमा हप्ता भरणा केलेल्या प्रत्येक पावतीवर एक क्यूआर कोड (QR Code) असतो. हा गुगल प्ले स्टोअरवरील कोणत्याही क्यूआर स्कॅनर अॅपद्वारे (QR Scanner APP) स्कॅन केला की मूळ ॲप्लिकेशन क्रमांकाच्या शेतकऱ्याचा सर्व तपशील दाखवतो. त्यामुळे येत्या काळात फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल, असे सांगण्यात आले.   गेल्या एक दोन हंगामांत खोट्या पावत्यांच्या आधारे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी पीकविमा हप्ता भरून घेणाऱ्या सायबर कॅफेचालकांकडूनच असे गैरप्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. संबंधित सायबर कॅफेचालक शेतकऱ्यांकडून पीकविमा भरणा करण्याच्या नावाखाली पैसे घेत होता. शेतकऱ्यांना पीकविमा भरणा केलेल्या पैशाच्या बनावट पावत्या दिल्या जात होत्या. अशा प्रकारे विमा न भरताच शेतकऱ्यांचे पैसे लाटले जात होते, अशा काही घटना निदर्शनाला आलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यभरात काही ठिकाणी पोलिसांत तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना विमा योजनेचा कोणताही लाभ मिळत नव्हता. कंपनीकडूनच विमा मिळालेला नाही, असे समजून शेतकरी गप्प राहत होते. शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तर मधल्यामध्ये सायबर केंद्रचालक मालमाल होत होते. याचा त्रास शेतकरी ते कृषी खात्याच्या राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांना होत होता.  आता मात्र कृषी खात्याच्या पुढाकारातून यापुढे अशा गैरकृत्यांना आळा बसणार आहे. सायबर कॅफेचालकांकडून बनावट पावत्या फोटोशॉपद्वारे तयार केल्या जातात. यासाठी अर्ज भरल्याच्या आधीचा (preview) स्क्रीन शॉट घेऊन त्यावर दुसऱ्या शेतकऱ्यांचा ॲप्लिकेशन आयडी क्रमांक चिकटवला जातो. आता ही खोटी पावती अगदी साध्या-सोप्या पद्धतीने पडताळणी करता येत आहे.  तसेच त्यापूर्वीच्या हंगामातील पावत्या तपासण्याची सोय राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या पाठपुराव्यामुळे पीकविमा पोर्टलवर करण्यात आली आहे. यात पावती क्रमांकाचे शेतकऱ्याचे नाव, हंगाम, जिल्हा, गाव व पॉलिसी नोंदणीची तारीख व नोंदणी कोणत्या चॅनेलमधून झाली. याचा तपशील उपलब्ध होतो. यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असल्यास संबंधित भागधारकाच्या लॉगिनमधून उपलब्ध होत आहे. केंद्र स्तरावरील आयटी संचालक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे कृषी खात्यातून सांगण्यात आले. या छोट्याशा सतर्कतेमुळे शेतकऱ्यांची फसगत टळणार असून, त्यांचे त्यांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही, असे कृषी खात्यातील उच्चपदस्थांनी सांगितले. अशी तपासा पावतीची सत्यता प्रत्येक पावतीवर एक क्यूआर कोड (QR Code) असतो. हा कोड गुगल प्ले स्टोअर वरील कोणत्याही क्यूआर स्कॅनर अॅपद्वारे (QR Scanner APP) स्कॅन केला की मूळ ॲप्लिकेशन क्रमांकाच्या शेतकऱ्यांचा सर्व तपशील दाखवतो. म्हणजेच पावती खोटी असल्यास लगेचच कळू शकते. कृषी खात्याच्या सतर्कतेमुळे क्यूआर कोड विमा हप्ता भरल्याच्या पावतीवर छापील स्वरूपात प्रसिद्ध केला जात आहे. खरीप २०१९ पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, क्षेत्र, पीक, विमा हप्ता रक्कम आदी तपशील मोबाईलवर दिसतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com