पोटापाण्यासाठी गाव सोडयाचं ठरवलया

पाऊस नसल्यानं खरीप हातचा गेलाय. रब्बी मधल्या पिकांची आशा बी गेलीया. पोरांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू लागलाय. चारा न्हाय...दोन बैलं आणि दोन म्हशी हायती दावणीला आता इकायची यळ आली. - रावसाहेब हरीबा पवार, लोणारवाडी, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली.
सांगली दुष्काळ
सांगली दुष्काळ

औवंदा लय होरपळ सुरू झाल्या..शेतात  बिया टाकल्या....पण निसर्गानं साथ दिली न्हाय बघा....शेतातनं कायबी मिळालं न्हाय....दाणवीची जित्राबं इकन्याशिवाय दुसरा पर्याय उरला न्हाय...हाताला काम मिळणं झालय....काम करायंच वयं राहिलं न्हाय... चार जनावरं भुंड्या माळावर मोकाट सोडल्याती अन्‌ इथं बसलूया...पोटापाण्यासाठी गाव सोडयाचं असं मनाशी ठरवलया... असं भुंड्या माळावर जित्राबं चरण्यासाठी आलेले ७५ वर्षांचे आप्पा दुधाळ अंकले (ता. जत) हताश होऊन गाऱ्हाणं सांगत होते. दुष्काळी पट्ट्यात परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी मशगात करून ठेवली होती. परंतु आजही शेती पिकाविना भकास दिसत होती. हवामान खात्याकडून पाऊस पडेल असं सांगत आहेत. आजही शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतोय. काही परिसरात शेतकऱ्यांनी मक्‍याची पेरणी केली आहे. कुठतरी उगवण झाली आहे.  हस्तावर शेतात पेरणी केली. हस्त कोरडा गेला. मिरगाची वाट पाहू लागलो. मिरगान आमच्यावर कृपादृष्टी केली नाय. पावसाचं चार थ्यांब पडलं. पण, त्याचा बी काय फायदा झाला न्हाय. पीक वाढली न्हाय. पिकांनी माना टाकल्या. अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिके हातची गेली. आर्थिक चणचण भासू लागल्या. पैका कुठून आणायंचा, दुष्काळी भागातील तिल्याळ गावातील भारत चव्हाण सांगत होते. परतीचा पाऊस पडलं असं वाटत हुत. पण पाऊस पडलाच न्हाय. आता रब्‍बीची आशा पूर्णत: मावळली आहे. हाताला काम मिळण्यासाठी यावर्षी स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिने गाव ओस पडणार आहे. गावगाडा थांबणार. अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्‍यांतील गावांची स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नड दूर होते. परंतु चारा मिळत नसल्याने दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचप्रमाणे जत तालुक्‍यातील अनेक कुटुंब ऊस तोडणीला दरवर्षी स्थलांतर होतात. मात्र, यंदा पाऊसकाळ नसल्याने गावच्या गावं ऊस तोडणीसाठी जाण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. अनेक भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या पोराबाळं, जित्राबं सोबत घेऊन स्थलांतर करण्यास प्रारंभ झाला आहे. 

सहा तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थिती जिल्ह्यातील जून ते सप्टेंबरच्या सरासरी पावसावर ट्रिगर एकमध्ये सात तालुक्‍यांत दुष्काळ सदृश स्थिती जाहीर केली होती. त्यानंतर ट्रिगर दोननुसार आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस जत आणि विटा हे सहा तालुके दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती जाहीर केली आहे. आटपाडी, कडेगाव, कवठे महांकाळ, पलूस या चार तालुक्‍यांत गंभीर स्वरूपाची दुष्काळ परिस्थिती जाहीर केली आहे. तर जत आणि खानापूर तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळ परिस्थिती जाहीर केली आहे. वास्तविक पाहता जत तालुक्‍यात ५३ टक्के पाऊस झाला आहे. असे असताना जत तालुका हा मध्यम स्वरूपाचा दुष्काळी परिस्थिती कशी जाहीर केली, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.   गोठ्यातील चारा संपला चारा मिळत नाही. फोड्या माळारानावर शेळ्या-मेंढ्या, जित्राबांना चारा मिळंल या आशेने पशूपालक जनावरं माळावर चरवण्यासाठी जात होते. परंतु माळरानावर केवळ वाळलेलं गवत दिसत होतं. माळावर चारा नसल्यानं जित्राब नुसतीच हिंडत होती. चारा पाणी नसल्याने जित्राबांच जिणं मुश्‍कील झालं आहे. आर्थिक नड भागवण्यासाठी जनावरं विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत होते. हाताला काम मिळंना... विजय शितोळे सांगत होते, आमच्या गावाला कुठलीही योजना नाही. केवळ पावसावर शेती केली जाते. गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदा पावसाने दडी मारल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. विहीरी, तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचे पाणी आठ दिवसांतून एकदा येत आहे. जनावरांना पाणी मिळत नाही. टॅंकरची मागणी करूनदेखील अद्यापही मंजूर झालेला नाही. गावातील ग्रामस्थांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे स्थलांतर होईल. पाऊस कमी जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्‍टोबर अखरे १०७ टक्के पाऊस झाला होता. यंदा सरासरी ८४ टक्के पाऊस झाला. म्हणजेच २३ टक्‍क्‍यांनी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात एकूण ६० मंडळे असून २१ मंडळात ७५ टक्के, ११ मंडळात ५० टक्के इतका पाऊस झाला आहे. तर एका मंडळात २५ टक्के हा आटपाडी तालुक्‍यात पाऊस झाला आहे. कडधान्याची उत्पादकता घटली दुष्काळी पट्ट्यात मूग, उडीद, मटकीचे पीक घेतले जाते. याच कडधान्यातून प्रपंचाचा गाडा चालतो. परंतु पाऊस झाला नसल्याने पिकं वाळून गेली. हातात काहीच लागले नाही. गेल्यावर्षीची एकरी चार ते पाच पोती उडिदाचे उत्पादन मिळाले होते. मात्र, यंदा एकरात केवळ एक ते अर्ध पोतचं उडिदाचे उत्पादन झाले आहे.  तलावात २५ टक्‍क्‍यांहून कमी पाणी : तासगाव-१, खानापूर-३, आटपाडी-३, जत-३, कवठे महांकाळ-१, मिरज-२ मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प- ८४ : उपयुक्त पाणीसाठा-५५.१५ द.श.ल.मी. २१ तलाव कोरडे : जत- १०, कवठे महांकाळ-३, आटपाडी-१, खानापूर-४, तासगाव-३  प्रतिक्रिया गावात पाणी न्हाय. हिरीला घोट घोट पाणी येतया.. या पाण्यात कसं जगायचं. घरात एक दोन पोती धान्य. तेवढ्यावरच भागवायचं. जनावरं पाळल्याती. पाणी हाय तवर पाजायचं अन्‌ प्याचबी. - आप्पा किसन दुधाळ, अंकले, ता. जत, जि. सांगली.

शेतात एकर उडीद पेरलं होतं. अर्ध पोतं उडीड झालया. अगोदरच कर्जाच्या विळख्यात अडकलोय. - पोपटराव हसबे , हिवरे, ता. खानापूर,

चार एकर द्राक्ष बागा होत्या. पाणी नसल्याने गेल्या वर्षी २ एकर बाग काढून टाकली. यंदा पाऊस नाही. उत्पन्न मिळणार नाही खर्च जादा म्हणून यावर्षी एक बाग काढली. - लक्ष्मण भूसनर, चुडेखिंड, ता. कवठे महांकाळ

मृग नक्षत्रावर बाजरीची पेरणी केली. पाऊस कसलाच पडला नाही. बाजरी वाया गेली. आर्थिक चणचण भासू लागली. सावकाराकडून टक्‍क्‍याने पैसा घ्यावा लागणार आहे. कामाला जावं म्हटलं तरी काम कुठेही नाही. - संजय यादव, तिल्याळ, ता. जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com