अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : भाजपची मागणी

अकोला ः जिल्ह्यात सरकारने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून चार जणांचा मृत्यू झाला. खरिपाची पिके १०० टक्के वाया गेली. कापूस, सोयाबीनचे पीक कमरेइतक्या पाण्यात होते. या संकटामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झालेला आहे. सरकारने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.  याबाबत जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर व पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे निवेदनही पाठवले. याबाबत म्हटले, की शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असताना सरकार मदत करेल की नाही यावर प्रश्‍नचिन्ह आहे. एकही मंत्री अद्याप शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेलेले नाहीत. पिके पाण्याखाली गेली. महापुराने जमिनी खरडून गेल्या. अशी परिस्थिती कधीच झालेली नव्हती. पंचनामे, पाहणीचे कागदोपत्री घोडे नाचविण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना सात-बारा बघून मदत करण्याची गरज आहे.  जिल्ह्यात सरासरी टक्केवारीच्या तुलनेत १०९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्यायला हवी. अगोदरच विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संताप आहे. याची दखल घेत तातडीने संकटात मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास सरकारला महागात पडेल, असा इशारा आमदार सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात रवी गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे, महापौर अर्चना मसने यांच्यासह इतरांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com