ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत द्या: फडणवीस 

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी.
devendra Fadnavis
devendra Fadnavis

मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. 

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गेल्या चार दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार माजविला. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. 

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरु असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. 

भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास १०-१२ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी म्हणजे कोणतेच पीक हाती नाही. ज्वारी सुद्धा मातीमोल झाली आहे. 

कोकणातील जिल्हे आणि पालघरमध्ये भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापले तरी संकट आणि नाही कापले तरी संकट, अशी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

सार्वत्रिक नुकसान  मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जiणार राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारपासून (ता.१९) तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. सोमवारी श्री. फडणवीस बारामतीपासून दौरा सुरु करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडा इत्यादी ठिकाणी दौरा करुन ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२०) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसऱ्या दिवशी, बुधवारी (ता.२१)हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com