जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट 

चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन पशुपालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. खिल्लार बैल सांभाळण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट  Decline in the price of purebred animals
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट  Decline in the price of purebred animals

कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन पशुपालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. खिलार बैल सांभाळण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. लॉकडाउनमुळे बाजार बंद व ग्राहक नसल्याने लाखो रुपयांचे बैलही काही हजार रुपयांत विकले जात आहेत. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी होत असल्याने त्याचा ही फटका संगोपन कामावर होत आहे.  कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बैल बाजार बंद झाले आहेत. प्रत्येक आठवड्याला होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे या बैलांच्या खरेदी विक्रीची देवाण-घेवाण बंद झाली आहे. लॉकडाउनमुळे ग्राहक मिळत नसल्याने दर कमी झाले. प्रत्येक बाजारात आलेले खिलार बैल म्हणजे, त्या बाजाराची शानच. डौलदार बैलजोडी दाखवत त्याची वैशिष्ट्य सांगत बैलांची किंमत करणे व होसेने बैल खरेदी करणे हे पाहणे हा तर आनंदाचा क्षण. पण बाजार बंदमुळे हे सगळे चक्र थांबले. यात शर्यत बंदची ही भर पडली. त्यामुळे खिलार बैलाचे शौकीन नाराज झाले आहेत.  चपळतेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट असणाऱ्या खिलार बैलाला बाजारात मोठी मागणी असते. या बैलांचा सांभाळ करणारा एक विशिष्ट वर्ग असल्याने जेवढा देखणा बैल तेवढी किंमत जास्त असते. अनेक जण एक वर्षापर्यंत वय असलेले खिल्लार खोंड विकत घेतात. त्याला परिपूर्ण आहार देऊन, मेहनत घेऊन त्याचा चपळ बैल तयार करतात. अगदी मनुष्यापेक्षा जास्त निगा या जनावरांची राखली जाते. साधारणत: असे बैल संगोपन करण्यासाठी दररोज तीनशे ते चारशे रुपयांचे खाणे या बैलांना दिले जाते. सध्याच्या परिस्थितीमुळे देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकांनी खिल्लार जनावरांची विक्री केली आहे. पशुपालकाकडे एकेकाळी ऐटदार जनावरांनी भरलेला गोठा आता सुना सुना भासत आहे. 

खिल्लार​ जोपासनेत घट  बहुतांशी पशुपालक खिलार जनावरांची पैदास आपल्या गोठ्यात राहावी यासाठी देशी गाईचे पालन करीत. खिल्लार गायीला खोंड झाले, की अगदी अपत्यप्राप्तीचा आनंद पशुपालकाला व्हायचा. त्याची जोपासना करणे त्याला वाढवणे आणि चांगली किंमत आल्यास त्याची विक्री करणे असा नित्यक्रम पशुपालकांचा असायचा. पण मागणी नसल्याने पशुपालकांत नाराजी आहे. यामुळेच जातिवंत खिल्लारची जोपासना करणाऱ्या पशुपालकात घट होत असल्याची माहिती पशुपालकांनी दिली. 

प्रतिक्रिया खिल्लार बैलांच्या जोपासणीत होणारी घट चिंताजनक आहे. माझ्याकडे सुमारे चाळीस खिलार बैल होते. पण जोपासना करणे अवघड झाल्याने त्याची विक्री केली. आता केवळ एक गाय गोठ्यात आहे.  अतुल बाबर, गोपालक शेतकरी, विटा 

प्रतिक्रिया

आमच्याकडे परंपरागत बैलजोड्या होत्या. या बैलजोड्यांना मशागतीलाही मागणी नसल्याने खर्च परवडत नाही. त्यामुळे आम्ही बैल नाइलाजास्तव विकले. 

- अजय कदम, शेतकरी, इचलकरंजी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com