नाशिक : कांदा दराअभावी बाजार समित्यांच्या उत्पन्नात निम्म्याने घट

कांदा दराअभावी बाजार समित्यांच्या उत्पन्नात निम्म्याने घट
कांदा दराअभावी बाजार समित्यांच्या उत्पन्नात निम्म्याने घट

येवला, जि. नाशिक : शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे चालू वर्षात जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या उत्पन्नात तब्बल निम्म्याने घट झाली आहे. एकट्या पिंपळगाव बाजार समितीला गत वर्षाच्या तुलनेत तब्बल सात कोटी तर येवला बाजार समितीला तीन कोटी, लासलगाव बाजार समितीला पाच कोटींचा फटका बसला आहे. 

जिल्ह्यात कांद्यासह भुसार धान्यामुळे लासलगाव व पिंपळगाव बसवंत आणि त्याखालोखाल येवला, निफाड, कळवण, मनमाड, नांदगाव, चांदवड आदिसह जिल्ह्यातील बाजार समित्यांना तब्बल ७५ कोटीपर्यंत झळ सहन करण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला मोबदला आणि हक्काचे मोल वेळेत मिळवून देण्यासाठी कार्यान्वित झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकरी, व्यापारी, आडते, माथाडी कामगार आदी घटकांना आधार देत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील बाजार समित्यांनी कांद्यासारख्या पिकाच्या जोरावर अजूनही तग धरला असला, तरी शासनाच्या धोरणामुळे बाजार समित्या आता मोडकळीस येतात की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. बाजार समितीत विक्री झालेल्या शेतमालाच्या विक्रीतून १ टक्का बाजार फीच्या रूपात उत्पन्न मिळते. यावरच कर्मचाऱ्यांच्या पगारापासून तर सोयी-सुविधांसह शेतकरी हिताची कामे व इतर व्यवस्थापन करावे लागते.

वास्तविक २०१७ - १८ मध्ये कांद्याला दीड ते दोन हजारापर्यंत भाव होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे उत्पन्न वाढले होते. मात्र, या वर्षी वर्षभर कांद्याचा भाव सरासरी पाचशे रुपये राहिला. परिणामी आवक टिकून असली तरी उत्पन्नात मात्र ५० ते ६० टक्के घट झाल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे.

शेतमालाचे भाव पडण्याला शासनाचे धोरण कारणीभूत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होताना बाजार समित्यांना उत्पन्नात घट होऊन अडचणींचा सामना करावा लागत आहे. - संतू पाटील-झांबरे,  अध्यक्ष, शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र

या वर्षी कांद्याचे उत्पादन वाढल्याने कांद्याची आवक टिकून आहे. मात्र, बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकरी वर्गाबरोबर बाजार समितीलासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावाचा प्रश्न सोडवला गेला तर शेतकरी व बाजार समित्यांना आर्थिक हानी पोचणार नाही. - उषाताई शिंदे, सभापती, बाजार समिती, येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com