मराठवाड्यातील दूध संकलनात घट

Decrease in milk collection in Marathwada
Decrease in milk collection in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी जानेवारीअखेरच्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर घट झाल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत घट दिसत असली तरी डिसेंबर २०१९ अखेरच्या संकलनाच्या तुलनेत मात्र जानेवारीअखेर प्रतिदिन दूध संकलनात किंचित वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गतवर्षी जानेवारीअखेर प्रतिदिन ११ लाख २२ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात होते. यामध्ये शासकीय १ लाख ४७ हजार लिटर, सहकारी २ लाख ७६ हजार लिटर, तर खासगीतील डेअऱ्यांच्या माध्यमातून संकलित सर्वाधिक ६ लाख ९९ हजार लिटर दुधाचा समावेश होता. 

यंदा मात्र, जानेवारी २०२० अखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शासकीय, खासगी व सहकारी दूध डेअऱ्यांच्या माध्यमातून संकलित केल्या जात असलेल्या दुधाचे संकलन ९ लाख २९ हजार लिटरवर अडकले आहे. त्यामध्ये शासकीय ३६ हजार लिटर, सहकारी २ लाख ५६ हजार लिटर, तर खासगी डेअऱ्यांच्या माध्यमातून संकलित ६ लाख ३७ हजार लिटर दुधाचा समावेश आहे. 

डिसेंबर २०१९ अखेर मराठवाड्यात प्रतिदिन ८ लाख ९६ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात होते. त्यामध्ये शासकीय डेअऱ्यांमार्फत संकलित होणाऱ्या ४३ हजार लिटर, सहकारी २ लाख २९ हजार लिटर, तर खासगी डेअऱ्यांमार्फत संकलित होणाऱ्या ६ लाख २४ हजार लिटर दुधाचा समावेश होता. 

आकडे पाहता गतवर्षी जानेवारी अखेरच्या तुलनेत मराठवाड्यातील प्रतिदिन दूध संकलनात १ लाख ९३ हजार लिटरची घट दिसते. परंतु डिसेंबर २०१९ च्या तुलनेत जानेवारी २०२० अखेर मात्र दूध संकलनात जवळपास ३१ हजार लिटरची वाढ दिसते आहे. मराठवाड्यात सहकारी ७, खासगी १८, तर शासकीय ५ डेअऱ्या आहेत.

मराठवाड्यातील खासगी, सहकारी व शासकीय डेअऱ्यांची प्रक्रियेची क्षमता प्रतिदिन १३ लाख ८० हजार लिटरची आहे. त्यामध्ये शासकीय प्रक्रिया प्रकल्पाच्या ३ लाख ३० हजार लिटरच्या क्षमतेसह सहकारी डेअऱ्यांच्या २ लाख ५० हजार लिटर व खासगी ८ लाख लिटर क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील शीतकरण केंद्राची क्षमता जवळपास ८ लाख ९ हजार लिटर दरदिवशी क्षमतेची आहे. त्यामध्ये शासनाच्या शीतकरण केंद्राची ८२ हजार लिटर, सहकारी २ लाख ४८ हजार लिटर, तर खासगी शीतकरण केंद्रांच्या ४ लाख ७९ हजार लिटर क्षमतेचा समावेश आहे.

संकलन घटण्यामागे दुधाची पळवापळवी दुधात दिसत असलेल्या घटीमागे नोंद न होणाऱ्या दुधाची भूमिका महत्त्वाची आहे. शासकीय दूध संकलनात होणाऱ्या घटीमागे शासनाच्या दराच्या तुलनेत मिळणारे प्रतिलिटर ७ ते ८ रुपये मिळणारे जादा दर हे महत्त्वाचे कारण मानले जाते. जादा दर देऊन संकलन करून होणारी पळवापळवी यामुळे ही घट दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुधाच्या या पळवापळवीला ३१० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले बटरचे, तर ३२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले पावडरचे उच्चांकी दरही कारण ठरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com