वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ

वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ

पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ (डीपडिप्रेशन) तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असून, बुधवारी (ता. २३) ‘मेकुणू’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. कमी दाबाच्या या प्रणालीमुळे समुद्रात तयार झालेले बाष्प ओमानकडे खेचून नेले आहे. त्यामुळे ओमान, येमन आणि सोमालीयाच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. तर भारतच्या पश्‍चिम किनाऱ्यालगत हलके ढग दिसून येत आहेत.   गेल्या आठवड्यात याच भागात आलेल्या ‘सागर’ चक्रीवादळाने अरबी समुद्रातील बाष्प ओढून नेल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आकाश निरभ्र होऊन पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण घटले. दक्षिण भारतात सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असले, तरी त्यात बाष्पाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. हे वादळ ओमानच्या दिशेकडे सरकल्यानंतर या भागात पुन्हा बाष्प गोळा होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पावसाचे प्रमाण पुन्हा वाढू शकेल.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली ताशी ११ किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता या भागात कमी तीव्रतेचे वादळ तयार झाले होते. सोकोट्रा बेटांपासून अग्नेयेकडे ५२० किलोमीटर, तर सलालाहपासून (आेमान)  ९३० किलोमीटर दक्षिणेकउे ही स्थिती होती. बुधवारी सकाळपर्यंत या स्थितीचे चक्रीवादळात तर गुरुवारपर्यंत (ता. २४) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहेत. 

हे वादळ शनिवारपर्यंत (ता. २६) ओमान आणि अग्नेय येमेनच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे. शनिवारपर्यंत पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून अति उंच लाटा उसळणार आहेत. २३ ते २६ मे या कालावधीत ही स्थिती कायम राहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  माॅन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक हवामान हाेत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानात साधारण: २० मेपर्यंत दखल होणारा मॉन्सून यंदा २३ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज होता. हवेचे दाब, वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते. हवामानात वेगाने होत असलेल्या बदलामुळे मॉन्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असून, या बदलांचे सातत्याने निरिक्षण केले जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com