पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा लागवड खोळंबली

आमच्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नवीन चारा उपलब्ध झालेला नाही. सध्या माझ्याकडे एकूण चौदा जनावरे आहेत. त्यांच्यासाठी विकत चारा घेत आहे. पाऊस होईल या अपेक्षेने अडीच एकरांवर मका लागवडीचे काम चालू आहे. त्याचे उत्पादन हाती येण्यासाठी दीड ते दोन महिने अजून लागतील. त्यानंतर चारा उपलब्ध होईल. - तपन हरचांदे, सोनवडी, ता. बारामती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे नगर, पुणे जिल्ह्यांत चारा लागवड खोळंबल्याची स्थिती आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात अवघ्या एक हजार १६ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही दीड ते दोन महिने वाट पाहावी लागणार असून तोपर्यंत चाराटंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.  

शेतीला पूरक उद्योग म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशींचे संगोपन करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्याटप्याने उपलब्ध होतो. याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाढ्याचा वापर चारा म्हणून करतात.

चाराटंचाईमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा लाभ बहुतांशी शेतकरी घेतात. 

यंदाही पुणे विभागात जानेवारी, फेब्रुवारीपासून चाराटंचाई भासण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे शासनाने नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील अनेक भागांत चारा छावण्या सुरू केल्या असून त्या आजतागायत सुरू आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नवीन चारा उपलब्ध होईल या हेतूने शेतकरी चारा छावण्यांतील जनावरे घरी घेऊन जात आहेत. त्यामुळे हळूहळू चारा छावण्या बंद होऊ लागल्या आहेत. परंतु पुरेसा पाऊस न झाल्याने अजूनही चारा पिकाची लागवड होऊ शकलेली नाही.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com