एकरकमी एफआरपी मिळण्यास विलंब

एकरकमी एफआरपी मिळण्यास विलंब
एकरकमी एफआरपी मिळण्यास विलंब

सांगली ः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेला साखर कारखानदार व आंदोलनकर्ते नेतेमंडळींनी वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन पन्नास दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले. साखरेच्या पडलेल्या दराचे कारण देऊन साखर कारखानदार एफआरपीची रक्‍कम एकरकमी देण्यास विलंब करीत आहेत. एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक असली तरी त्यांच्या गेल्या आठवड्यातील आंदोलनाला थंडा प्रतिसाद मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलाविना संकटात सापडला आहे. 

सन २०१८-१९ च्या गळीत हंगामाकरिता एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य करून ऊस आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व साखर कारखानदारांनी तोडगा काढला होता. ऊसदराबाबत आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, असा शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना वगळता अन्य संघटनांचा आग्रह कायम आहे. अजित नरदे, संजय कोले यांनी मात्र एफआरपीच्या ८० टक्के रक्कम स्वीकारण्यास शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. 

ऊस कारखान्यास गेल्यामुळे चौदा दिवसांत ऊस बिल मिळणार, या आशेवर ऊस उत्पादकांनी केलेले खर्चाचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या वर्षभरातील खते, बी-बियाणे दुकानदारांची देणी, घरातील मुला-मुलींचे विवाह, घरबांधणी, वाहन खरेदी, ऊस गेलेल्या ऊस पिकांसाठी    खते, भरणी, खोडवा काढणी, खते आदी सर्वच बाबींचे नियोजन अडचणीत आले आहे. याशिवाय उसाचे बिल कर्ज खाते वेळेत भरल्यास व्याजदरामध्ये सवलत मिळणार या अपेक्षेवर शेतकरी आहेत. मात्र, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेला साखर कारखानदार व आंदोलनकर्ता नेते मंडळींनी वाटाण्याचा अक्षता लावण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.

एफआरपीची रक्‍कम कायद्याने चौदा दिवसांत न दिल्याने शासनाने साखर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारखान्यांवर प्रशासक नेमून ऊस उत्पादकांची बिले दिली पाहिजेत, असा कायदा सांगतो. तो मात्र सरकारच पाळत नाही. सद्य:परिस्थितीत पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी हतबल झालेत. - श्रीकांत वडगावे, शेतकरी, कवठेपिरान. 

एफआरपी एकरकमी न देण्याचे कारण साखरेचे पडलेले दर असे साखर कारखानदार सांगत आहेत. काही साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहेत. मात्र, सहकारामधील कारखानदार आणि काही मंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून एफआरपी देण्यास मज्जाव केला आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com