राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
अॅग्रोमनी
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर तांदळाला उठाव
देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे. परदेशातून मागणी वाढल्याने यंदा आंबेमोहोर व कोलम या नॉन बासमती तांदळाला बाजारपेठेत उठाव राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे. परदेशातून मागणी वाढल्याने यंदा आंबेमोहोर व कोलम या नॉन बासमती तांदळाला बाजारपेठेत उठाव राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही तांदळाच्या किमती क्विंटलला पाचशे रुपयांनी वाढल्या आहेत.
डिसेंबरच्या मध्यापासून तांदळाच्या हंगामास प्रारंभ झाला आहे. हंगामाच्या प्रारंभी निर्यातदार मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथून आंबेमोहोर तांदळाची तर मध्य प्रदेशातून कोलमची जोरदार खरेदी करत असल्याने यंदा या दोन्ही जातींना सुरवातीलाच चांगला दर मिळत आहे. आफ्रिका, युरोप, अमेरिका या देशांतून गेल्या वर्षीपासून या दोन जातींच्या तांदळाला अधिक मागणी आहे.
सध्या भात पट्यामध्ये भातापासून तांदूळ करण्याची प्रक्रिया वेगात सुरु झाली आहे. जसा तांदूळ तयार होईल तसा तो विविध राज्यांमध्ये पाठविला जात आहे. परदेशात या दोन्ही तांदळाला मागणी वाढत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी या दोन जातींच्या तांदळाच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात तरी दोन्ही जातींचे दर चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.
११७५ लाख टन उत्पादनाची शक्यता
देशात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने भात उत्पादक पट्ट्यातून तांदळाचे उत्पादनही चांगले झाले आहे. यंदा देशात ९७५ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. यातून ११७५ लाख टन तांदळाचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या तांदळाची आवक होत आहे. निर्यातदारांनी यंदाच्या हंगामाच्या सुरवातीलाच आंबेमोहोर व कोलम या दोन्ही जातीच्या भातांवर पकड ठेवून चढ्या दराने खरेदी करण्यास प्रारंभ केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचशे रुपये क्विंटलने तांदळाचे दर वाढले आहेत.
दरात ५०० रुपयांनी वाढ
डिसेंबर २०१९ मध्ये आंबेमोहोरला मध्य प्रदेशात जागेवर क्विंटलला ५५०० ते ६००० रुपये दर होता. यंदा हा दर वाढून ६००० ते ६५०० रुपयापर्यंत गेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये डिसेंबर २०१९ ला ६००० ते ६५०० होता. यंदा ६५०० ते ७००० दर मिळत आहे. मध्य प्रदेशात जागेवर कोलम तांदूळ ४००० ते ४५०० रुपये दराने विकला जात होता. यंदा यात क्विंटलला ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या वर्षी आंबेमोहोर व कोलमला चांगली मागणी राहिली. या पार्श्वभूमीवर यंदाही तांदळाची खरेदी करताना निर्यातदारांनी या दोन जातींच्या तांदळाला पसंती दिली आहे. साहजिकच जागेवरुनच विक्री होताना त्यांच्या किमती वाढल्या आहेत. आंबेमोहोरची मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून खरेदी होते. नॉन बासमतीमध्ये दराच्या बाबतीत दोन्ही जाती इतर तांदळापेक्षा अग्रेसर राहतील हे निश्चित आहे.
- राजेश शहा, संचालक, जयराज ग्रुप, पुणे
- 1 of 30
- ››