मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळी

कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि कुमकुवत पुरवठा असल्याने देशांतर्गत कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सीसीआयला खरेदी करण्याची गरज पडणार नाही.
Demand for cotton has soared this year
Demand for cotton has soared this year

पुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि कुमकुवत पुरवठा असल्याने देशांतर्गत कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सीसीआयला खरेदी करण्याची गरज पडणार नाही. बाजारात कापसाचे दर ७००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास शेतकरी माल रोखून धरतील. मागणी जास्त असल्याने सूतगिरण्या आक्रमक खरेदी करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही कापूस यंदा भाव खाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विचारपूर्वक विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये केले. 

सरकारने २०२१-२२ च्या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी ६०२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. 

सीसीआयचे अध्यक्ष प्रदीप अगरवाल म्हणाले, की सध्या कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) यंदा बाजारात हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. कापूस हंगाम २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ‘सीसीआय’ने एकूण ५५ हजार कोटींचा २ कोटी ७ लाख कापूस गाठी खरेदी केला. सध्या कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक आहेत. त्यामुळे बाजारात सीसीआयला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. २०२१-२२ च्या हंगामात देशात ३५५ ते ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगातही ३५५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा लागवड क्षेत्र १३३ लाख हेक्टरवरून यंदा १२५ लाख हेक्टरवर आले आहे. 

लुईस ड्रेफस कंपनीचे कापूस महाव्यवस्थापक सुमीत मित्तल म्हणाले, की अमेरिकेकडे यंदा कापसाचा शिल्लक साठा कमी असल्याने इंटरनॅशनल कॉटन एक्स्चेंजवर कापसाचे दर वाढलेले आहेत. तसेच जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांत उत्पादनाची स्थिती मजबूत नाही. त्यामुळे २०२१-२२ च्या हंगामात कापसाची वाटचाल आशादायक असेल.

व्यावसायिक धीरज खेतान म्हणाले, की चांगले मार्जिन राहत असल्याने कापसाला सूतगिरण्यांकडून देशांतर्गत चांगली मागणी असून, निर्यातीसाठी मागणी आहे. देशांतर्गत दर वाढलेले असतानाही मागणी असल्याने सूतगिरण्या मोठी खरेदी करत आहे. तसेच पुरवठ्यापेक्षा वापर जास्त वाढला आहे. 

डीडी कॉटनचे संचालक अरुण सेखसारिया म्हणाले, की नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बाजारात दैनंदिन सरासरी दोन लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक वाढल्यास देशातील काही भागांत सीसीआयला खरेदीसाठी उतरावे लागेल.

सात हजारांपेक्षा कमी दरात शेतकरी विक्री करणार नाहीत महेश सारडा म्हणाले, की यंदा कापूस बाजाराला मागणीचा मजबूत आधार आहे. बाजारात कापसाचे दर हे ७००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास शेतकरी कापूस विकणार नाहीत. सूतगिरण्यांना चांगला नफा होत असल्यास अशीच खरेदी आणखी जास्त काळ होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कापसाला चांगली मागणी आहे. सीसीआयला तेलंगणा वगळता इतर ठिकाणी कापूस खरेदी करावी लागणार नाही, असे मला वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com