टोमॅटोसाठी पाकिस्तान, बांगलादेश सीमा खुल्या ठेवण्याची मागणी

बांगलादेश व पाकिस्तान हे भारतीय टोमॅटोचे खरेदीदार देश आहेत. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचा थेट परिणाम टोमॅटोच्या बाजारावर होतो. मागील वर्षीही सीमा बंद होती. त्यामुळे पाकिस्तानमध्ये रोज सरासरी ४० ट्रक जाणारा माल थोपवून राहिला. यंदा त्यात सुधारणा झाली तरच टोमॅटोच्या बाजारात उठाव येऊ शकतो. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - नसीम मोहम्मद, टोमॅटो निर्यातदार.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यंदा टोमॅटोचे बंपर उत्पादन आले असून, येत्या महिनाभरात टोमॅटोची आवक आणखी वाढणार आहे. दर कोसळल्याने मातीमोल भावात टोमॅटो बाजारात विकावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. `राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर इ. जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहेत. यंदा चांगला पाऊस आणि पोषक हवामानामुळे राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने सध्या पिंपळगाव व लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.

पिंपळगाव बाजार समिती व लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज साधारणतः १० हजार क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. मात्र प्रतिक्रेट(वीस किलो) अवघा ५० ते १०० रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार त्यांचा टोमॅटो पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियानासह देशातील इतर राज्यांत ट्रकद्वारे पाठवितात.

निर्यातक्षम टोमॅटो पाकिस्तान, बांगलादेश, ओमान, दुबई, मलेशिया, कतार इ. देशांत निर्यात होतो. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी टोमॅटो हंगामात बकरी ईद, मोहरम आदी सणांमुळे मागणी वाढते. मात्र सध्या दोन्ही देशांत तणावाचे वातावरण असल्यामुळे भारत-पाकिस्तानची सीमा बंद आहे. त्यामुळे एेन हंगामात टोमॅटोची निर्यात बंद असल्याने टोमॅटो पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, दुबई, ओमान, कतार इ. देशांत पाठविण्यासाठी, तसेच भारतातील सर्व राज्यांच्या सीमा फक्त शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात,` असे निवेदनात म्हटले आहे. टोमॅटो वाहतुकीवरील खर्च कमी होण्यासाठी निर्यात शुल्क कमी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मागणी व दर स्थिर पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय पाटील म्हणाले की, कर्नाटकसह बहुतांश राज्यांतील टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. या स्थितीत मागणी स्थिर व आवक जास्त असल्याने टोमॅटोचे बाजार स्थिर आहेत. येत्या काळात नाशिक जिल्ह्यातील आवकेत अजून वाढ होण्याची स्थिती आहे. पिकाची स्थिती चांगली असल्याने आवक वाढतीच राहण्याची शक्यता आहे. दसऱ्यादरम्यान टोमॅटोला मागणी वाढेल. त्या काळात दरात अजून काही प्रमाणात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

पिंपळगावला टोमॅटो आवक वाढतीच पिंपळगाव बसवंत बाजार समितीत बुधवारी (ता. ५) टोमॅटोची १ लाख ५८ हजार ४८० क्रेटची आवक झाली. काल प्रति २० किलोच्या क्रेटला ६० ते २६१ रुपये व सरासरी १५५ रुपये दर निघाला. मागील आठवड्यात ही आवक २ लाख क्रेटपर्यंत पोचली होती. त्यावेळी प्रति क्रेटला ४० ते ११५ व सरासरी ९० रुपये दर होता. पिंपळगाव बसवंत ही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. १०० आडते व १५०० व्यापारी या बाजार समितीतून देशातील व देशाबाहेरील बाजारपेठेत टोमॅटो पाठवितात.

आमच्या भागातील टोमॅटो पीक आता बांधणीच्या अवस्थेत आहे. अजून महिनाभराने उत्पादन सुरू होईल. त्या वेळी चांगला दर मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. खर्च तर खूपच वाढला आहे. प्रति क्रेट किमान २०० रुपये दर मिळाला तरच खर्च निघणार आहे, असे गिरणारे येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी  योगेश घुले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com