भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ

कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या भाजीपाला लागवडी आता वेग घेत आहेत. रोप वाटिकांमध्येही रोपांची मागणी सुधारली आहे.
vegetable plants
vegetable plants

कोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या भाजीपाला लागवडी आता वेग घेत आहेत. रोप वाटिकांमध्येही रोपांची मागणी सुधारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोप लागवड कमी असली तरी गेल्या महिनाभरातील वाढत्या मागणीने रोपवाटिका चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जूनच्या तुलनेत जुलै नंतर रोपांच्या मागणीत तीस टक्क्यापर्यंत सुधारणा झाली आहे. जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकांमधून भाजीपाल्याची रोपे राज्यभरात जातात. विशेष करून पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रोपवाटिकेतून रोपांची मोठी उलाढाल होत असते. परंतु यंदा कोविडमुळे सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या. कोकोपीटसह अन्य कच्चामाल न मिळाल्याने रोपे तयार करणे जिकिरीचे झाले होते. मे नंतर रोपे तयार करण्यासाठी थोडा वेग आला. पण त्याच दरम्यान राज्यभरात भाजीपाल्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात खाली आल्याने शेतकऱ्यांनी ही भाजीपाल्याकडे दुर्लक्ष केले. नोंदवलेली मागणी रद्द झाल्याने रोपवाटिकाचालक संकटात गेले. शेतीपूरक उद्योग म्हणून उभ्या केलेल्या लहान रोपवाटिकांना ही याचा मोठा फटका बसला. यामुळे अनेकांनी रोपवाटिकेत नवी रोपे तयार करणे कमी केले होते.  गेल्या महिन्यापासून पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने राज्यभरात शेतकरी भाजीपाला लागवडीला प्राधान्य देत आहेत. यामुळे रोपांच्या मागणीत हळूहळू वाढ होत आहे. विशेष करून टोमॅटो, फ्लॉवर सह अन्य भाजीपाला रोपांना मागणी वाढत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. वाहतुकीचा अडथळा न राहिल्याने कच्चा माल ही वेळेत उपलब्ध होत आहे. यामुळे रोपे ही गतीने तयार होत आहेत.

प्रतिक्रिया गेल्या महिन्यापासून भाजीपाला रोपांच्या मागणीत चांगली सुधारणा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी कमी असली तरी सध्या मात्र रोपवाटिका चालकांचे थांबलेले चक्र सुरू झाले आहे. हळूहळू राज्यातून रोप मागणीत वाढ होत आहे.  - शिवाजीराव कचरे,  रोपवाटिका चालक, तमदलगे, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com