`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी

घोड धरणात मृत पाणीसाठा शिल्लक आहे
घोड धरणात मृत पाणीसाठा शिल्लक आहे

न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाचे पाणलोट व लाभक्षेत्र पावसापासून वंचित आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती `जैसे थे` आहे. घोड धरणावरील कुकडी प्रकल्पात समाधानकारक पावसामुळे सहा टीएमसीच्या आसपास पाणीसाठा झाला आहे. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यातून दोन टीएमसी पाणी घोड जलाशयात सोडावे, अशी मागणी होत आहे. 

घोडमधील पाण्याचा फायदा शिरूर, श्रीगोंदा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला होतो. त्याचबरोबर रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत, याशिवाय दोन्ही तालुक्‍यांतील अनेक गावांना पिण्यासाठी होतो. गतवर्षी घोडच्या पाणलोट क्षेत्रात अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे जलाशयातही अल्प प्रमाणात पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, त्यानंतर गरज लक्षात घेऊन कुकडी प्रकल्पातून पाणी सोडून जलाशय भरून घेण्यात आला होता. त्या पाण्याचे घोड विभागाने फेब्रुवारीअखेर नियोजन केले होते. मात्र, पाणीसाठा संपल्यानंतर लाभक्षेत्रात मार्चपासून दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे.

त्याचदरम्यान उसाबरोबर इतर पिकेही उद्‌ध्वस्त झाली. त्याचबरोबर जनावरांना चारा कमी पडू लागल्याने दूध उत्पादनही घटले. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शिरूर तालुक्‍यातील इनामगाव, शिरसगाव काटा आदी गावांत ग्रामस्थांना पिण्यासाठी टॅंकर सुरू केले आहेत. चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला, तरीही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. घोड जलाशयात आजअखेर मृत पाणीसाठा आहे. तरीही, जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमूग, मुगाची पेरणी केली. मात्र, ही पिके आता जळून चालली आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. अद्यापही गावोगावी पिण्याच्या पिण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. मागील सहा महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती `जैसे थे` आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी धास्तावले आहेत. कुकडी प्रकल्पातून घोड जलाशयात पाणी सोडल्यास परिसराला काहीसा दिलासा मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com