सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणार

देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन सरासरी ९ लाख क्विंटलची आवक राहिली. तर सरासरी दर ४५०० ते ५१५० रुपयांवर होते. पुढील काळात बाजारातील सोयाबीन आवक वाढणार असून स्टॉकिस्ट, सट्टेबाज, प्रक्रिया प्लांट्स आणि व्यापारी खरेदीत उतरत असल्याने मागणी राहील
Demand will also increase with the arrival of soybeans
Demand will also increase with the arrival of soybeans

पुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन सरासरी ९ लाख क्विंटलची आवक राहिली. तर सरासरी दर ४५०० ते ५१५० रुपयांवर होते. पुढील काळात बाजारातील सोयाबीन आवक वाढणार असून स्टॉकिस्ट, सट्टेबाज, प्रक्रिया प्लांट्स आणि व्यापारी खरेदीत उतरत असल्याने मागणी राहील. परिणामी सध्याच्या दरात तेजी-मंदी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी सांगितले. 

चालू सप्ताहात देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दैनंदिन आवक वाढत आहे. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सोयाबीन भिजले होते, मात्र आता बहुतांशी भागात सोयाबीनध्ये आर्द्रता कमी येत आहे. त्यातच ऑक्टोबर महिना संपत आला असून, आवक मात्र मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. सोयाबीन आवकेचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. मात्र दर कमी झाल्याने शेतकरी माल विकण्यास इच्छुक नाहीत. तसेच दर वाढीची अपेक्षा असल्याने शेतकरी सोयाबीन मागे ठेवत आहेत. त्यातच स्टाॅकिस्ट बाजारात खरेदीत उतरत आहेत, त्यामुळे सोयाबीनचे दर चालू सप्ताहात काहीसे सुधारले, अशी माहिती जाणकारांनी दिली. 

रिफाइंड सोयातेल आणि सोयापेंडचे दर अद्यापही वरच्या पातळीवर असल्याने चालू सप्ताहात मागणी साधारणच होती. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे दर काहीसे कमी झाले, मात्र देशांतर्गत बाजारातील दर नगण्य प्रमाणात उतरले. सणांच्या काळात खाद्यतेल ग्राहकांना स्वस्त मिळावे या अट्टहासाने सरकारने अनेक निर्णय घेतले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारच तेजीच असल्याने दरांवर परिणाम झाला नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर अविश्‍वास दाखवत व्यापारी आणि स्टाॅकिस्ट मोठी खरेदी करण्यास धजावत नाहीत, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

आवक, मागणीही वाढणार सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी असली तरी पुढील सप्ताहात आणि दिवाळीनंतर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबरच मागणी वाढणार आहे. स्टाॅकिस्ट, सट्टेबाज, प्रक्रिया प्लांट्स आणि व्यापारी खरेदीत उतरतील तेव्हा आवक वाढली तरी दरात जास्त चढ-उतार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे दर सध्याच्या पातळीवर टिकून राहतील, असे जाणकारांनी सांगितले. 

सोयातेल, सोयापेंडची स्थिती चालू सप्ताहात रिफाइंड सोयाबीन तेलाच्या दरात दहा किलोमागे १५ ते ३० रुपयांनी सुधारले. या सुधारणेसह तेलाचे भाव मध्य प्रदेशात प्रतिदहा किलोसाठी १२८५ ते १३१० रुपये, गुजरातमध्ये १२७० ते १२८० रुपये, राजस्थान १३०० ते १३०५ रुपये आणि महाराष्ट्रात १२९५ ते १३५० रुपयांवर राहिले. चालू सप्ताहात सोयापेंडला देशांतर्गत आणि निर्यातीसाठीची मागणी सामान्य राहिली. सरकारच्या निर्णयाचा परिणाम म्हणून याही सप्ताहात दरात प्रतिटन ५०० ते १००० रुपयांपर्यंत घट झाली. चालू सप्ताहात सोयापेंडचे सरासरी दर ३८ हजार ७०० रुपये ते ४२ हजार रुपयांवर राहिले.

आवक आणि दराची स्थिती चालू सप्ताहात देशातील बाजारात सोयाबीनची दैनंदिन आवक सरासरी ९ लाख क्विंटलची राहिली. यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सरासरी आवक प्रत्येकी तीन लाख क्विंटलच्या आसपास होती. तर बाजार समित्यांत सोयाबीनचे दर गेल्या हप्त्याच्या तुलनेत ५० ते १०० रुपयांनी सुधारून सरासरी ४५०० ते ५१५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान राहिले. तर प्लांट डिलिव्हरीचे दर ५० ते १५० रुपयांनी सुधारून ५१५० ते ५९०० रुपयांच्या दरम्यान होते. यात मध्य प्रदेशात ५१०० ते ५३५० रुपये, महाराष्ट्र ५२०० ते ५४७५ रुपये आणि राजस्थानधील प्लांटचे दर ५४०० ते ५९०० रुपयांच्या सरासरीवर होते, अशी माहिती जाणकारांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com