नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला, बागलाण, कळवण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासात जिल्‍ह्यात ८१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर वंचित राहिलेला भाग पावसाच्या परिघात समाविष्ट झाला. ऐन पावसाळ्यात आठ तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिती सुधारण्यास यामुळे हातभार लागला आहे.
पाणीटंचाईमुळे पाण्याचे टँकर सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी स्थितीचा आढावा घेऊन गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. नाशिक शहराला पिण्यासाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणात कपातीचे संकेत दिले होते. या घडामोडी घडत असताना पावसाचे पुनरागमन झाले. त्याने आपला परीघही विस्तारला. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पेठ तालुक्यात (१०१ मिलीमीटर) तर, सर्वात कमी दिंडोरी तालुक्यात (१४ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. इगतपुरीत (६५), त्र्यंबकेश्वरमध्ये (४६), सुरगाण्यात (८६), नाशिकमध्ये (२७) मिलिमीटरची नोंद झाली. हे तालुके पावसाचे म्हणूनच अोळखले जातात. तिथे आधी दमदार पाऊस झाला होता. मात्र, या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला. निफाड (५४), सिन्नर (२६), चांदवड (५४), देवळा (४३), येवला (५९), नांदगाव (६०), मालेगाव (६४), बागलाण आणि कळवण (प्रत्येकी ५७) मिलिमीटरइतका पाऊस पडला.
पावसामुळे दारणा धरणातून ४१७२, गंगापूर धरणातून १०१२ आणि नांदूरमध्यमेश्वरमधून ४७६९ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे गोदावरी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, कोणताही धोका पत्करू नये, नदीकाठी, नदीवरील पुलांवर गर्दी करू नये, सेल्फी घेण्याचा किंवा पुरात पोहण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.  ऑगस्टमध्ये ८५ ते ९० टक्के जलसाठा राखणे क्रमप्राप्त आहे. यामुळे तूर्तास धरणे भरू न देता विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ४४ हजार ७०७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सात टक्क्य़ांनी कमी आहे.
गंगापूर धरणात (५०४२), काश्यपी (१८४१), गौतमी गोदावरी (१६७२), पालखेड (४०१), करंजवण (५०५५), वाघाड (२३०२), ओझरखेड (१२७६), पुणेगाव (५५३), तिसगाव (१५०), दारणा (६८०९), भावली (१४३४), मुकणे (३९२४), वालदेवी (११३३), कडवा (१५९८), नांदूरमध्यमेश्वर (२५३), भोजापूर (१६८), चणकापूर (१८७८), हरणबारी (११६६), केळझर (५७२), गिरणा (५६१३), पुनद (८९७) दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. नागासाक्या, माणिकपुंज धरणे अद्याप कोरडी आहेत.
सहा धरणे तुडुंब आळंदी, वाघाड, भावली, हरणबारी, केळझर, वालदेवी
आठ भरण्याच्या मार्गावर गंगापूर, दारणा, काश्यपी, गौतमी गोदावरी, करंजवण, पुणेगाव, कडवा, नांदूरमध्यमेश्वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com