सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी देशमुख

सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी देशमुख
सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी देशमुख

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विजयकुमार देशमुख यांची सोमवारी (ता. १०) बिनविरोध निवड झाली. सभापतीपदासाठी बाळासाहेब शेळके आणि जितेंद्र साठे या दोघांची नावे चर्चेत होती. पण ऐनवेळी या दोन्ही नावावर संचालकांचे एकमत झाले नाही. पालकमंत्री देशमुख यांच्या नावावर सहमती झाली आणि अखेरीस त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. बाजार समितीच्या इतिहासात पालकमंत्र्याच्या रूपाने पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला. 

माजी आमदार दिलीप माने यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी सोमवारी निवड झाली. देशमुख यांनी सभापतीपदासाठी दोन अर्ज भरले. त्यांना सूचक म्हणून बाळासाहेब शेळके आणि अनुमोदक म्हणून उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी स्वाक्षरी केली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाजार समितीच्या आवारात वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. 

गेल्यावर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलविरुद्ध विजयकुमार देशमुख यांनी काॅँग्रेसच्या नेतेमंडळींशी हातमिळवणी केली. काॅँग्रेस, राष्ट्रवादी काॅँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी करून निवडणूक लढवली. त्या वेळी सहकारमंत्र्यांच्या पॅनेलला केवळ दोनच जागा मिळाल्या. आघाडीला १६ जागा मिळाल्या. त्यात स्वतः पालकमंत्री विजयी झाले, तसेच काॅँग्रेसचे सर्वाधिक १० संचालक निवडून आले.

राष्ट्रवादी काॅँग्रेसचा एक आणि शिवसेनेचे दोन संचालक निवडून आले. वास्तविक, आघाडीकडे काॅँग्रेसचे सर्वाधिक १० संचालक होते. त्यामुळे ते सहजासहजी ही निवडणूक जिंकले असते. पण काॅँग्रेसतंर्गत राजकारणाचा फायदा भाजपने घेतला. 

शेळके यांचा नाराजीचा सूर

या निवडणुकीमध्ये बाळासाहेब शेळके यांनी सहभाग घेऊन देशमुख यांच्यासाठी त्यांनी सूचक म्हणून सही केली. पण, या निवडीनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. सभापतीपदाबाबत जे ठरले होते, ते झाले नाही. राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला, अशा शब्दात शेळके यांनी आपली नाराजी प्रकट केली.

सहकारमंत्र्यांनी गमावले,पालकमंत्र्यांनी कमावले

बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यापासूनच सहकारमंत्री आणि पालकमंत्री असे गट पडले. सहकारमंत्र्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यात त्यांच्या पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे राज्याचे सहकारमंत्री असूनही त्यांना या निवडणुकीतून फारसे हाती काहीच लागले नाही. त्यांनी बाजार समितीवरील सत्ता गमावली. पण पालकमंत्र्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली. बेरजेचे राजकारण करत राजकीय कौशल्याने भाजपचे संख्याबळ कमी असतानाही सभापतीपद मिळवून सत्ता कमावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com