ॲग्रोवन’ जलसमृद्धी बक्षीस योजना : मोहोळचे देशमुख ठिबक संचाचे मानकरी

​माझी चार एकर शेती असून विहिरीच्या पाण्यावर ऊस, मका, ज्वारी, गहू पिके घेतो. ‘ॲग्रोवन'च्या ठिबक सिंचन संचाच्या बक्षिसातून १ एकर डाळिंब बाग लावणार आहे. या बक्षिसामुळे माझे डाळिंब बागेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. - अरुण शिवाजी देशमुख, पाटकुल ता. मोहोळ (जि.सोलापूर)
बक्षीस योजना
बक्षीस योजना

पुणे: ‘सकाळ ॲग्रोवन'च्या वतीने घेण्यात आलेल्या ॲग्रोवन जलसमृद्धी योजनेमध्ये पहिल्या बक्षिसाचे मानकरी पाटकुल ता. मोहोळ (जि. सोलापूर) येथील अरुण शिवाजी देशमुख ठरले आहेत. त्यांना ड्रीप इंडिया इरिगेशन कंपनीकडून ८० हजार रुपयांचा स्वयंचलित ठिबक सिंचन संच मिळाला आहे. या बक्षिसातून मिळालेल्या ठिबक सिंचन संचावर एक एकर डाळिंब बाग लावणार असल्याचे श्री. देशमुख यांनी नंतर ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.  बक्षीस योजनेची सोडत शनिवारी (ता. ७) जलसंपदा विभागाचे माजी महासंचालक व जलतज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे तसेच ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा. लि.चे संचालक झुंबरलाल भंडारी, अजय बायोटेक इंडिया लि.चे संचालक डॉ. एस. सरकार, सहयोगी उपाध्यक्ष गौरव चांदककर, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या उपस्थित काढण्यात आली. या वेळी ड्रीप इंडिया इरिगेशनचे वरिष्ठ ॲग्रॉनॉमिस्ट अनिलकुमार बिऱ्हाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ. मोरे म्हणाले, ‘‘ शेतीला फक्त पाणी उपलब्ध झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. पाणी मोजून वापरण्याची शिस्त आणण्याची गरज आहे. काटेकोर पाणी वापरासाठी शेतकऱ्यांना साधने आणि कौशल्य द्यावी लागतील. तज्ज्ञांच्या मतानुसार शेतकऱ्याच्या पाच जणांच्या कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी किमान २० एकर शेती हवी. त्याचबरोबर वर्षात दोन पिके घेता येईल एवढे पाणीही त्याला मिळायला हवे. केवळ हौस म्हणून नव्हे, तर साखर कारखान्यांकडून शाश्‍वत दर मिळणार असल्याने शेतकरी ऊस लावतो. कोणते पीक घ्यावे याबाबत त्याच्यावर सक्ती करता येणार नाही.’’ ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘जागतिक तापमानवाढीचे परिणाम सध्याच्या पूर आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये दिसू लागले आहेत. सांगली, कोल्हापूरमध्ये महापुराची स्थिती असताना, मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्‍याच्या काटेकोर व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या पाणी वाटपाच्या पद्धतीत आधुनिकता आणणे गरजेचे आहे. पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनासाठी ‘ॲग्रोवन’ने जलव्यवस्थापन वर्ष जाहीर केले आहे. ’’कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन'चे वरिष्ठ वितरण व्यवस्थाक संभाजी घोरपडे यांनी केले, तर आभार मुख्य वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी यांनी मानले. ‘ॲग्रोवन'ने ३ मे ते ३१ जुलैदरम्यान प्रश्‍नमंजूषा आणि कूपन योजना जाहीर केली होती. या योजनेमध्ये ९ लाख ५१ हजार रुपयांची १ हजार १११ बक्षिसे जाहीर केली होती. पहिले बक्षीस ८० हजार रुपयांचे स्वयंचलित ठिबक सिंचन संच, तर दुसरे बक्षीस ४० हजार रुपयांचे दोन ठिबक सिंचन संच आहे. अन्य बक्षिसे अशी ः तिसरे- ३० हजार रुपयांचे ३ स्प्रिंकलर संच, चौथे- साडेतीन हजार रुपयांची २५ ठिबक टेप संच, पाचवे- ७० स्क्रीन फिल्टर,  सहावे- अजय बायोटेक प्लांट न्यूट्रिशनकडून ५०० बक्षिसे, तर ५१० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.   दुसऱ्या आणि तिसऱ्या बक्षिसाचे मानकरी  दुसरे बक्षिसे ः दिगंबर भाऊसाहेब कदम (ओझर मिग, ता. निफाड,  नाशिक) व भरत ज्ञानोबा फत्तेपुरे (भातागळी ता. लोहारा जि. उस्मानाबाद)   तिसरे बक्षीस ः मोहन बाबूराव मोरे, (नित्रळ, सातारा), पटेल महंमदरसूल गफुरखाॅं (सुगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड) व दत्तात्रय विठ्ठल निकम, (पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक) (उर्वरित बक्षीस विजेत्यांची नावे विभागनिहाय १६ सप्टेंबरपासून ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध केली जाणार आहेत. तसेच कंपनी प्रतिनिधी विजेत्यांशी संपर्क करून बक्षिसे देणार आहे.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com