वाळू उपसणाऱ्या ३८ बोटी उद्‌ध्वस्त

वाळू उपसणाऱ्या ३८ बोटी उद्‌ध्वस्त
वाळू उपसणाऱ्या ३८ बोटी उद्‌ध्वस्त

सोलापूर  : उजनी जलाशयात चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा सपाटाच वाळू माफियांनी लावला होता. मात्र, वाळूमाफिया हद्दीचा फायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती. इंदापूर, दौंड व करमाळा या तीन तालुक्‍यांतील पथकांच्या वतीने गुरुवारी (ता. १४) उजनी जलाशयातील कोंढारचिंचोली (ता. करमाळा) परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. त्यात ३८ बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्या. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत नष्ट करण्यात आला. 

कोंढारचिंचोली (ता. करमाळा), डिकसळ (ता. इंदापूर) व खानोटा (ता. दौंड) या तिन्ही तालुक्‍यांची हद्द उजनी जलाशयात अाहे. त्यामुळे महसूल प्रशासनाला कारवाई करताना अडचण येत होती. त्यातच अवैध वाळू उपशाचा हा खेळ ‘रात्रीस खेळ चाले'' असा होता. सध्या कडक उन्हामुळे उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून जलाशयाचा सखल भाग उघडा पडत आहे. त्यामुळे शेतकरी व्याकूळ होत आहेत. वाळू उपसा होत असल्याने दूषित पाणी अधिकच दूषित होत आहे. 

 वाळू उपशामुळे जलाशयावर लाखोंच्या संख्येने आलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईमुळे अवैध वाळू उपशाला यापुढे अटकाव होण्याची शक्‍यता आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून शासनानेही अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे गरजेचे होते. यापुढेही जलाशयात अवैध वाळू उपसा होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. 

या कारवाईमध्ये इंदापूरच्या तहसीलदार मोटे व त्यांचे पथक, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, करमाळ्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर त्याबरोबरच करमाळा तालुक्‍यातून केत्तूर महसूलचे मंडल अधिकारी सुहास बदे, संजय शेटे (जिंती), एस. यू. डिकोळे (गुळसडी), सुरेश राऊत (वाशिंबे), विवेक कसबे (आळजापूर), टी. बी. मोरे (पांडे), मयूर गावडे (पोथरे), आर. एच. माने (केत्तूर), आनंद ढोणे (पारेवाडी) या तलाठ्यांसह जिंती दूरक्षेत्राचे समीर खैरे, सोमनाथ पाटील आदी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com