महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : उद्धव ठाकरे 

मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल.
Uddhav thakarey
Uddhav thakarey

मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल. सुमारे २५ वर्षांपासूनच्या मित्राने विश्‍वासघात केल्याने भिन्न विचारी पक्ष एकत्र आलो असलो तरी राज्याचे भले करणे हा आमच्या तिघांमधील समानधागा आहे. भाजप विरोधी आघाडीचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचा विचार योग्य वेळी करू. ममता बॅनर्जी यांच्याशी या संदर्भात संपर्क असतो,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत केले.  महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांनी विविध विषयांवर परखडपणे मते व्यक्त केली. ‘‘मी पुन्हा येणार, योग्य वेळी येणार असे काहीही मी म्हणत नाही. मात्र भाजपच्या वरवंट्याखाली न दबता ममता बॅनर्जी यांच्या सारख्या नेत्यांसह भाजपविरोधी आघाडी बांधणे गरजेचे झाले आहे,’’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  गेल्या एका वर्षात पुलाखालून-पुलावरून बरेच पाणी वाहून गेले आहे. पण केंद्रीय पथके महाराष्ट्राची पाहणी करण्यासाठी अद्याप आलेलीच नाहीत, याकडे लक्ष वेधत त्यांनी मोदी सरकारवर हल्ला केला. पंचवीस खासदार निवडून आणून आपण राष्ट्रीय राजकारणात जाणार का? या प्रश्नावर, ‘‘जे स्वप्नरंजन करतात त्यांना ते लखलाभ. मी जनतेचे प्रश्न सोडवितो,’’ एवढेच ते म्हणाले.  ‘‘अभूतपूर्व परिस्थितीत मी मुख्यमंत्री झालो. पण, अन्य सहकारी पक्षांच्या मदतीने सरकार चालवतो आहे. प्रशासनाचा अनुभव नसतानाही महाराष्ट्रात व्यवस्था निर्माण केल्या. मन लावून जीव ओतून काम केले. चीनने १५ दिवसात कोविड रुग्णालय उभे केले तर, महाराष्ट्राने १७ दिवसात. आयुष्याची ससेहोलपट सुरू असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या न लपविता साडेआठ हजार रुग्णखाटांची संख्या पावणेसात लाखांवर नेली,’’ अशी माहिती देऊन ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारने व्यवस्था उभारली पण, ती वापरण्याची वेळच येऊ न देणे ही जनतेची जबाबदारी आहे. मास्क लावाल, अंतर राखाल तर, कोरोनाला दूर राखता येईल.’’ 

पातळी सोडणार नाही  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षात समसमान वाटपाचा शब्द देवून तो पाळला गेला नाही. २५ वर्षांच्या मैत्रीतील काळे मन असे उघड झाले. आम्ही काय काय सहन केले ते केवळ मैत्रीपूर्ण भावनेमुळे कधी उघड केले नाही, असा आरोप करून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही काय भोगले, कुणाचे मन किती काळे होते ते आता जगासमोर आले. कुटुंबावर आरोप करण्याची पातळी गाठली गेली. मुलांवर, पत्नीवर आरोप केले गेले ही विकृती आहे. ती माझी संस्कृती नाही. माझ्या हिंदुत्वात विकृतीला स्थान नाही. मी पंतप्रधान मोदींच्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबावर आरोप केले नाहीत. विकृत राजकारण मी करणार नाही. दिवस बदलतात. सर्वशक्तिमान वाटणाऱ्यांचाही काळ बदलतो. बाहेरून आलेल्यांच्या सल्ल्याने भाजपचा कारभार चालतो आहे. खडसे नकोसे का होताहेत या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. त्यांना बोलायचे ते बोलू देत. मी त्या पातळीवर जाणार नाही.’’ 

लसीकरण कसे करणार ?  ‘‘कोरोनावर अजूनही लस सापडलेली नाही. किमान दोनवेळा लस टोचावी लागेल असे दिसते आहे. महाराष्ट्रातील जनता १२ कोटी, दोनदा टोचणे म्हणजे २४ कोटी सुया. हे कसे साधणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात जात आहेत. त्यांनी याबद्दलच्या शंका विचारून घ्याव्यात अशी अपेक्षा आहे. जगभरात काय सुरु आहे ते लक्षात घेऊन पावले टाकावीत. ‘पॉझ’चे बटन दाबले गेले आहे, त्यातून बाहेर पडायचे असेल तर वेगळा विचार करावा लागेल. माहिती लपविणे पाप आहे, सामोरे जाणे हेच खरे महत्त्वाचे. १०० वर्षांपूर्वी असा साथीचा रोग फैलावला होता. त्याकाळी महाराष्ट्रात एक कोटी मृत्यू झाले. आता जो लढा दिला त्याची नंतर नोंद घेतली जाईल असा विश्वास आहे,’’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राने या काळात १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील ६० ते ७० टक्के प्रत्यक्षात उतरताहेत. परिस्थिती रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.’’  दाटीवाटीने जगणाऱ्या मुंबईसाठी ‘कोविड’चे धडे काय? यावर ते म्हणाले, ‘‘जगात असे कोणते शहर आहे जिथे वस्ती विरळ झाली अन् संसर्ग आटोक्यात आला. धारावीत जे साधले त्याचे जगाने कौतुक केले. पण, आपल्याच लोकांनी आक्षेप घेतले. विरोधकांचे काळे मन बाहेर आले.’’ 

राष्ट्रवादी आमच्यासमवेतच  भाजपमधील काही नेत्यांना, सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना दूर गेली याचे वैषम्य वाटते. भविष्यात तिकडे परतणार का? या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता ठाकरे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात भाजपकडे जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीत भाजपच्या दिशेने जाण्याच्या काही हालचाली सुरु आहेत का? या प्रश्‍नावर त्यांनी ठाम नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेटायला येतात तेव्हा कित्येक विषय निघतात. बाळासाहेबांपासूनचे संबंध आहेत. ते येतात त्या वेळी मी लगेच पाटी घेऊन बसत नाही, असेही ते म्हणाले. 

अनधिकृत बांधकामांबाबत आक्षेप  सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी प्रकरणी दिलेल्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे यांनी काही वक्तव्य केले नाही. मात्र, कंगना प्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल मी स्वत: वाचला नसला तरी, अनधिकृत बांधकामाबद्दल आक्षेप घेतला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

खर्च कमी केला  राज्याला वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) परतावा मिळालेला नसल्याने आर्थिक अडचणी आहेत, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘‘विभागांचा खर्च ३३ टक्क्यांवर आणला आहे. आता हळूहळू सगळे बदलते आहे. परिस्थिती सुधारते आहे. पण, ‘वर्क फ्रॉम होम’बाबत काही प्रथा पडल्या, दररोज कार्यालयात न जाता काही दिवस घरातून काम, दूरस्थ शिक्षण, कार्यालयांच्या वेगळ्या वेळा असा विचार झाला तर ते उत्तम ठरेल.’’ 

विनाश नकोच  मेट्रो कारशेडच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी ते म्हणाले, ‘‘ही जागा केंद्राची होती तर, ते शांत का बसले? कोण कुठला विकसक तो काय म्हणतोय? या प्रश्नांची उत्तरे मी एका सादरीकरणातून देणार आहे. १४ मार्गिका तयार होणार आहेत. कारशेड हलविल्यामुळे काम थांबलेले नाही. विनाश होवू नये यासाठी काही निर्णय घेणे आवश्यक असते. ते घेतले.’’ 

आता मोट बांधतोय  पूर्वी सत्तेबाहेरून सूत्रे हलवित होतात, आता ‘रिमोट कंट्रोल’ सोडून थेट मुख्यमंत्री झाला आहात... या प्रश्नाला अर्ध्यात तोडत ठाकरे म्हणाले, ‘‘पूर्वी रिमोट हाती ठेवायचो, आता मोट बांधतो आहे. तिन्ही पक्षांना, अपक्षांना बरोबर ठेवून काम सुरु आहे. सगळेच सहकार्य करीत आहेत.’ 

उद्धव ठाकरे म्हणाले ....  २५ वर्षांपासूनच्या मित्राने विश्‍वासघात केला  माझ्या हिंदुत्वात विकृतीला स्थान नाही  लसीबाबतच्या शंका पंतप्रधानांनी दूर कराव्यात  कारशेडची जागा केंद्राची, मग ते शांत का बसले?   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com