कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा विकास हाच केंद्रबिंदू ः कुलगुरू ढवण

कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी यंत्रमानव याव्दारे शेती उपयोगी उपकरणांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे सुलभरीत्या करता येतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा विकास हाच केंद्रबिंदू ः कुलगुरू ढवण

परभणी ः मराठवाड्यातील कोरडवाहू शेती समोरील सद्यःस्थितीत निर्माण झालेली आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन हवामान बदलांमध्ये तग धरणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर राहणार आहे. जागतिक बॅंक अर्थसहाय्यित डिजिटल शेती प्रकल्पाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी यंत्रमानव याव्दारे शेती उपयोगी उपकरणांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे सुलभरीत्या करता येतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आकांक्षा आणि स्वतंत्र विभागवार शेती संशोधनाच्या गरजा लक्षात घेऊन परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मंगळवारी (ता. १८) सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त डॉ. ढवण यांच्याशी ॲग्रोवनने संवाद साधला.

डॉ. ढवण म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षात कोरडवाहू शेती आणि शेतकरी हाच विद्यापीठाच्या संशोधनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विद्यापीठाच्या कोरडवाहू क्षेत्रातील कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. आजवर विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाण, ९२४ संशोधन शिफारशी आणि ४६ कृषी अवजारे विकसित केली आहेत. विद्यापीठाच्या ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे एकाहून एक सरस वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत झाली. कपाशीच्या नांदेड ४४ वाणांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली. या वाणामध्ये बीटी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला. ज्वारीचा परभणी शक्ती व बाजारीचा एबीएच १२०० हे जैवसमृद्ध वाण कुपोषणावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. तुरीच्या बीडीएन ७११ वाणास राज्यभरातील शेतकऱ्यांची पसंती आहे. यांत्रिक काढणीसाठी उपयुक्त सोयाबीनच्या एमएयूएस १६२ या वाणासह अन्य वाण राज्यात लोकप्रिय आहेत. फळपीक संशोधन केंद्राव्दारे आंबा, मोसंबी, केळी, सीताफळ या पिकांच्या गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत.

आगामी काळात बीजी २ तंत्रज्ञानयुक्त कपाशीचे दोन वाण येणार आहेत. बांबू लागवड तसेच त्यापासून मूल्यवर्धित वस्तू निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. महिला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान अॅपचे लोकार्पण केले जाणार आहे. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com