साखरेला ३१०० रुपये एफआरपीची मागणी करु : मुख्यमंत्री फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर  : उसाच्या एफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेपर्यंत शासन गप्प बसणार नाही. याबरोबरच साखरेचा किमान भाव २९०० रुपये बांधून दिला असून, तो किमान ३१०० रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा कोडोली (जि. कोल्हापूर) येथे दिली.  रयत क्रांती संघटनेच्या वतीने झालेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार शिवाजीराव नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या चार वर्षात एफआरपीसाठी एकदाही आंदोलन करायला लागले नाही. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात एफआरपीचे पैसे देण्यावर शासनाने भर दिला. राज्याने २१ हजार कोटी एफआरपीचे पैसे दिले, केवळ १२० कोटी बाकी असून तेही प्राधान्य क्रमाने देण्यास शासन बांधील आहे. स्वामिनाथन यांनी हा अहवाल सन २००५ मध्ये सादर केला, पण सन २०१४ पर्यंत हा अहवाल धुळखात पडला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ‘‘दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा प्राधान्याने उपलब्ध करुरून देण्याबरोबरच बॅंकांच्या कर्ज वसुलीला स्थगिती वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काला स्थगिती यासह रोजगार हमीच्या कामाला प्राधान्य अशा दुष्काळाच्या सर्व सुविधा आणि सवलती दिल्या जातील. केंद्राचे पथक येऊन गेल्यानंतर शेतकऱ्यांना थेट मदत व विम्याचे संरक्षण दिले जाईल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.  श्री. खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता चौफेर हल्ला चढविला. निवडणुका जवळ आल्याने आता आंदोलनाची वेळ आली आहे. यंदा नक्कीच दर चांगला मिळणार आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार नाही. आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने यंदाच्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये इतका दर मागत आहाेत.  यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अजितसिंह काटकर, सागर खोत यांच्यासह विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल आदी यावेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com