तरुणांच्या हाताला काम देणारे नवे उद्योग धोरण ः मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई : नव्या औद्योगिक धोरणामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राची घोडदौड सुरू झाली असून, सामान्य तरुणांच्या हाताला काम देणारे धोरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित नवे ‘औद्योगिक धोरण पुस्तिका २०१९’ आणि ‘उद्योग वैभव’ या कॉफी टेबलबुकच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या नव्या उद्योग धोरणामुळे सूक्ष्म व लघू मध्यम उपक्रमांना चालना मिळणार असून, संशोधन व विकास कार्यक्रमांना गती मिळणार आहे. तसेच मैत्री कक्षाचे सक्षमीकरण करण्यात आले असून, मोठ्या व विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. राज्याचे २०२५ पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सर्व उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधी प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिश्रम घेत आहे. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदांमुळे राज्यात सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. या परिषदांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे, कृषी उत्पादन वाढविणे, फलोत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी नवीन धोरणात सुधारणा करण्यात आल्या. पायाभूत सुविधांचा विकास, नवीन उद्योजकांना प्रोत्साहन आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाद्वारे कुशल रोजगारक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे हे या नव्या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या नव्या धोरणामुळेच महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर राहणार आहे. कृषी क्षेत्राचा मोठा विकास होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा’मुळे ४० लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार असून, ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणारे असे हे सर्वसमावेशक धोरण आहे. याच वेळी त्यांनी उद्योग विभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. उद्धव ठाकरे म्हणाले, नव्या औद्योगिक धोरणांचा फायदा बेरोजगारांना होऊन त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. या नवीन उद्योग धोरणामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे विमान उंच भरारी घेईल. उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी नवीन उद्योग धोरणाचे सादरीकरण केले.  भारतातील जर्मनीचे वाणिज्य प्रतिनिधी डॉ. मोझदार यांनी इन्डो-जर्मन उद्योगासंदर्भात बोलताना महाराष्ट्रात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू झाल्याचे सांगितले. तर उद्योगपती पीयूष खंबाटा यांनी महाराष्ट्राचे उद्योग धोरण उद्योगवाढीला पोषक असल्याचे सांगून मुख्यमंत्री नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.  शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, विविध देशांतील राजदूत, वाणिज्य प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते. नवी औद्योगिक क्रांती होईल ः देसाई उद्योगमंत्री देसाई म्हणाले, की उद्योग विभागाने देशातील उत्तम उद्योग धोरण तयार केले आहे. सर्व उद्योजकांना उपयुक्त ठरणारे हे धोरण असून, पुढच्या पाच वर्षांत नवी औद्योगिक क्रांती झालेली पाहायला मिळेल. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये नव्याने विमानतळ सुरू झाले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊन तेथील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईत भारतातील पहिले ज्वेलरी पार्क सुरू झाले आहे. तेथे १४ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याचबरोबर एक लाख लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com