सहकार बळकटीकरणासाठी राज्य बँकेला शासनाचे पाठबळ : मुख्यमंत्री फडणवीस

सहकार बळकटीकरणासाठी राज्य बँकेला शासनाचे पाठबळ : मुख्यमंत्री फडणवीस
सहकार बळकटीकरणासाठी राज्य बँकेला शासनाचे पाठबळ : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.  बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार  भारत भालके, सहकार आयुक्त सतीश सोनी, बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक आर. एल. बायस, विशेष कार्य अधिकारी अजित देशमुख  आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकाराच्या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण वारकरी पंथ हा सहकारावर आधारित आहे. विठ्ठल नामात एकरूप होऊन, एकमेकाला साह्य करून दिंडी चालली जाते. सहकाराचे क्षेत्रही असेच आहे. समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन समाजातल्या लोकांसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. बँकेने १०७ वर्षे पूर्ण करून १०८ व्या वर्षात पदार्पण करणे हे बाब बँकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या वाटचालीत बँकेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. आता बँक राज्यातील सहकार क्षेत्रात जिथे अडचणी आहेत तिथे पोचते आहे. सहकारी साखर कारखान्यांनाही त्यातूनच मदत केली जात आहे. कारखान्यांवर राज्यातील शेतकऱ्यांचे स्थैर्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना मदत करावीच लागेल. पण आता सूतगिरण्यांनाही मदत करावी लागेल. ‘‘राज्य बँक सहकाराचे क्षेत्र बळकट आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांनाही मदत करावी लागेल. जिल्हा सहकारी बँकांची अवस्था बिकट झाल्यास शेतकरी अडचणीत येतो. त्याला अन्य पर्याय राहत नाही. त्यामुळे या बँका मजबूत केल्या पाहिजेत. त्या जिवंत राहाव्यात, त्यांच्या विस्तारातून शेतकऱ्याला मदत करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. या बँकांच्या मदतीसाठी शिखर बँक म्हणून तयार केलेला आराखडा राबविण्यासाठी राज्य पाठबळ देईल,’’ असेही त्यांनी सांगितले. शिखर बँकेने कालानुरूप उपविधीमध्ये बदल स्वीकारल्याचे आणि त्यातून अधिक पारदर्शकतेचा आग्रह धरल्याचे कौतुक करून राज्य सहकारी बँकेला सदृढ करण्यात प्रयत्न करणाऱ्या प्रशासक मंडळाबरोबरच, अधिकारी व कर्मचारी बँकेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी राज्य बँकेने ग्रामीण भागात पाेचून, सहकार आणखी समृद्ध करावा असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com